सिडकोवासीयांवर वीजतारांची टांगती तलवार
By Admin | Updated: December 7, 2015 22:24 IST2015-12-07T22:23:28+5:302015-12-07T22:24:29+5:30
जीवघेणा प्रकार : घरासमोरच उच्चदाबाच्या वीजतारा; वारंवार तक्रार करूनही अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष

सिडकोवासीयांवर वीजतारांची टांगती तलवार
नरेंद्र दंडगव्हाळ, सिडको
परिसरातील नागरिकांच्या घरासमोरच जीवघेण्या उच्चदाबाच्या वीजतारा लोंबकळत असून यामुळे आजवर अनेकांना जीव गमवावा लागला आहे. यातच रविवारी (दि.६) याच विद्युत तारांचा झटका लागून एका युवकाला प्राण गमवावे लागले. मात्र या वीजतारा भूमिगत करण्याची जबाबदारी असणाऱ्या वीज वितरण कंपनीने यातून हात झटकल्याने आजवर बहुतांशी कामे ही येथील नगरसेवकांनी त्यांच्या निधीतून केली आहेत.
सिडको ही कामगार वस्ती असून, येथे सर्वसामान्य कुटुंबातील नागरिक राहतात. सुरुवातीस सिडकोने दिलेल्या घरांवर आता नागरिकांनी वाढीव बांधकाम केल्याने उच्चदाबाच्या वीजतारा या नागरिकांच्या अगदी घरांवरच लोंबकळताना दिसत आहेत. पूर्वी या वीजतारा नागरिकांच्या घरालगत होत्या. त्यातील बहुतांशी तारा नगरसेवकांनी त्यांचा निधी वापरून भूमिगत केल्या. घरांसमोरील लोंबकळणाऱ्या विद्युत तारांबरोबरच रस्त्यांना अडथळा ठरणारे उच्चदाबाचे पोल हटविणे ही सर्व जबाबदारी वीज वितरण कंपनीची आहे.
या वीजतारा भूमिगत कराव्यात, यासाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, नागरिकांबरोबरच नगरसेवकांनीही वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चे, आंदोलने केली आहेत. परंतु यानंतरही निर्ढावलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून फक्त निधी मंजूर नाही, वरिष्ठांना कळवितो अशाच प्रकारची उत्तरे दिली जातात. येथील अधिकाऱ्यांना तसेच वीज वितरण कंपनीस नागरिकांचा जीव जात असला तरी काही देणे-घेणे नसल्याचेच यातून दिसून येत आहे. वीजतारा भूमिगत कराव्यात याबाबत येथील नागरिक हे नगरसेवकांना सांगतात. नगरसेवकही त्यांच्या निधीतून त्या वीजतारा भूमिगत करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे तरी सिडकोतील बहुतांशी वीजतारा भूमिगत झाल्या आहेत. परंतु अजूनही राणाप्रताप चौक, दत्त चौक, विजयनगर, साईबाबानगर, तोरणानगर यांसह सिडकोतील काही भागात अद्यापही जीवघेण्या वीजतारा लोंबकळताना दिसत आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वीच दत्त चौकात कपडे वाळत टाकताना एका महिलेस विद्युत तारांचा झटका लागून अपघात झाला होता. या पाठोपाठच रविवारी (दि.६) झाडांवरील पतंग काढण्याच्या नादात सागर शिरसाठ या युवकास उच्चवीज दाबाच्या तारेचा शॉक लागून जीव गमवावा लागला. अशा अनेक घटना या सातत्याने घडत असतानाही महावितरण कंपनीचे अधिकारी मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत. दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवसांतही पतंग उडविताना अपघात होतात. महिनाभरावर मकर संक्रांत येत असल्याने आतापासूनच घरांच्या गच्चीवर पतंग खेळण्यासाठी मुले दिसत असून आतातरी वीज वितरण कंपनीने या वीजतारा भूमिगत करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
वीजतारा भूमिगत कराव्यात : नुकसानभरपाई मिळावी
घरासमोरील लोंबकळणार्या धोकादायक वीजतारा भूमिगत कराव्यात, तसेच विजेचा शॉक लागून मयत झालेल्या युवकाच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी लोकहिताय संघर्ष समितीच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांना निवेदन देण्यात आले. सिडकोतील बहुतांशी भागात नागरिकांच्या घरासमोरून धोकादायक वीजतारा लोंबकळत असून, रविवारी यामुळे सागर शिरसाठ या युवकाचा मृत्यू झाला. येथील वीजतारा या भूमिगत कराव्यात, तसेच मयत झालेल्या सागर यास नुकसानभरपाई मिळावी या मागणीसाठी लोकहिताय संघर्ष समितीच्या महावितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी. डी. शिदोरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात लक्ष्मीनगर, दत्त चौक येथील वीजतारांसह इतर भागांतील वीजतारा या भूमिगत करण्याची मागणी करण्यात आली असून, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी राजाभाऊ मोहन, श्रीकांत अलई, कृष्णा शिंदे, यू. टी. इंगळे, किशोर भामरे, चंद्रकांत सूर्यवंशी, गिरीश कुंभारे, श्याम शिरसाठ, नारायण जाधव, राहुल शिरसाठ आदि उपस्थित होते.