बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न विफल ठरणार?
By Admin | Updated: September 23, 2015 23:02 IST2015-09-23T23:01:41+5:302015-09-23T23:02:12+5:30
जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था निवडणूक

बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न विफल ठरणार?
नाशिक : जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेची होणारी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेले परिश्रम वाया जाण्याची चिन्हे असून या निवडणुकीत दोन पॅनलची निर्मिती होण्याची चिन्हे आहेत.
जुन्या चेहऱ्यांनाच वारंवार संधी दिली जात असल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेतील नव्यानेच भरती झालेल्या व तरुण कर्मचारी पतसंस्था निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून त्यादृष्टीने रोजच अनौपचारिक बैठका घेण्यात येत आहेत; मात्र जुन्या व अनुभवी पदाधिकाऱ्यांनी पतसंस्था निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या सर्वच संवर्गाच्या संघटना पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे समजते. काही ठरावीक संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी संचालक पदाचा ‘कोटा’ ही निश्चित करण्यात आला असून त्यानुसार त्या संवर्गातून संबंधित कर्मचारी संघटनेने कोणत्याही एखाद-दुसऱ्या नावाची शिफारस करण्यास सांगण्यात आले आहे.
मुळातच काही संवर्गातील सभासद कर्मचाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतपत असतानाही त्यांना सरसकट जागांचा कोटा बहाल केल्याने बहुसंख्य सभासद कर्मचारी असलेल्या संवर्गातील इच्छुकांचा त्यामुळे हिरमोड झाल्याची चर्चा आहे. त्यातूनच जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या बिनविरोध निवडणुकीला खो बसल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये आहे.
गुरुवारी (दि. २४) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची
अंतिम मुदत असून त्यानंतरच खऱ्या अर्थाने निवडणूक बिनविरोध होते की दुरंगी होते? याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)