भूमिपुत्रांच्या नोकरीचा प्रश्न चिघळणार
By Admin | Updated: October 23, 2016 23:00 IST2016-10-23T22:59:58+5:302016-10-23T23:00:47+5:30
घोटी : स्थानिकांना प्राधान्य न दिल्याने नाराजी

भूमिपुत्रांच्या नोकरीचा प्रश्न चिघळणार
घोटी : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल फोटो फिल्म लिमिटेड कंपनीसाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी संपादन केलेल्या असताना, तालुक्यातील मुकणे धरणातून पाणी दिले असताना या कंपनीमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. स्थानिकांना नोकऱ्या देण्यात याव्या यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने आता या मागणीसाठी कंपनीच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करून कंपनीचा रस्ता बंद करण्याचा आक्रमक पवित्रा मनसेने घेतला आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात बैठका घेण्यात येत आहेत. याबाबत मनसेचे सरचिटणीस रतनकुमार इचम, उपजिल्हाप्रमुख संदीप किर्वे, तालुकाध्यक्ष मूलचंद भगत यांनी गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त, औद्योगिक महामंडळाचे आयुक्त, जिल्हा उद्योग केंद्र, निमा, तहसीलदार, पोलीस प्रशासन आदिंकडे पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्यामुळे महाराष्ट्र नवीनर्माण सेनेने आंदोलन करण्याचे निश्चित केले आहे. दरम्यान, या आंदोलनाच्या जनजागृतीसाठी तालुक्यातील मुंढेगाव, सोमज, मोगरे, मालुजे, समनेरे, वाघेरे, नांदगाव सदो, माणिकखांब आदि गावांत बैठका घेण्यात आल्या. या बैठकीस जिल्हा सरचिटणीस रतनकुमार इचम, तालुकाध्यक्ष संदीप किर्वे, मूलचंद भगत यांच्यासह गणेश उगले, प्रताप जाखेरे, सुशील गायकर, भगीरथ मराडे, एकनाथ गायकर, विजय भोर, नंदू पांडेकर, सोमनाथ कडू, जनार्दन गतिर, अंकुश गतिर, मनोज भगत, मच्छिंद्र भटाटे, बाळू
चव्हाण, बलायदुरी, नीलेश जोशी, अनिल भटाटे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)