‘त्या’ रिंगरोडवर पालिक ा ‘दिवे लावणार’?
By Admin | Updated: September 29, 2015 22:57 IST2015-09-29T22:56:26+5:302015-09-29T22:57:27+5:30
अपघातांना निमंत्रण : दिव्याखाली अंधार कायम

‘त्या’ रिंगरोडवर पालिक ा ‘दिवे लावणार’?
नाशिक : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून शहराबाहेरून जाणारे रिंगरोड विकसित केले. याअंतर्गत अर्धवट का होईना श्रीश्री रविशंकर दिव्य मार्ग विकसित करण्यात आला. पुणे महामार्गापासून कॅनॉलरोडपर्यंत रस्ता विकसित झाला आहे; मात्र वडाळागावातून इंदिरानगरपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण अर्धवट स्थितीत पडून आहे. तसेच म्हसोबा महाराज चौफुली ते इंदिरानगरपर्यंत रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य असल्यामुळे पालिका प्रशासनाकडून ‘दिवे लावले’ जातील का, असा प्रश्न संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
श्रीश्री रविशंकर दिव्य मार्ग हा औरंगाबाद, पुणे, मुंबई अशा तिन्ही महामार्गांना शहराबाहेरून जोडणारा अतिमहत्त्वाचा रस्ता आहे. त्यामुळे पालिकेने या रस्त्याचे पुणे महामार्गापासून तर वडाळागाव सावित्रीबाई फुले झोपडपट्टीपर्यंत रुंदीकरण केले. येथून पुढे काही मीटरपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले आहे. मांगीरबाबा मंदिरापासून पुढे थेट इंदिरानगरपर्यंत रस्त्यावर पथदीप पूर्णपणे लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हा संपूर्ण रस्ता रात्री अंधारात हरविलेला असतो. अंधारामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. कॅनॉलरोडपर्यंत रविशंकर रस्त्यावर पथदीपांचा लखलखाट पहावयास मिळतो, तर तेथून पुढे इंदिरानगरकडे जाणारा मार्ग मात्र वाहनचालकांना ‘शोधावा’ लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
बंद पथदीपांमुळे अंधाराचे साम्राज्य
रखडलेल्या रस्त्याचे रुंदीकरण-डांबरीकरण अद्याप पालिकेने सुरू केले नसून, कुंभमेळा आटोपूनदेखील या रस्त्याच्या कामाला ‘मुहूर्त’ लागला नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच घरकुल प्रकल्पापासून पुढे शेतमळ्याच्या अडथळ्यामध्ये रस्त्याचे रुंदीकरण खोळंबले आहे. या रस्त्यावर कॅनॉलरोडपासून पुढे पथदीप बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य कायम आहे.