होईल चारपट गर्दी; मग कशी देतील मोकळीक?
By Admin | Updated: September 4, 2015 23:35 IST2015-09-04T23:34:11+5:302015-09-04T23:35:41+5:30
होईल चारपट गर्दी; मग कशी देतील मोकळीक?

होईल चारपट गर्दी; मग कशी देतील मोकळीक?
नाशिक : रक्षाबंधनामुळे पहिल्या पर्वणीला पाठ फिरविणारे देशभरातील भाविक दुसऱ्या पर्वणीच्या अमावास्येच्या शुभ मुहूर्तावर चारपट गर्दी करतील, मग पहिल्या पर्वणीला आलेले भाविक किती असा साहजिक उपस्थित होणारा प्रश्न कायम असेल तर मग एकपट भाविकांसाठी संपूर्ण शहराची गळचेपी करणारी यंत्रणा चारपट गर्दीच्या वेळी मोकळीक कशी देतील?
दुसऱ्या पर्वणीच्या फेरनियोजनासाठी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बोलविण्यात आलेल्या गुरुवारच्या बैठकीत शहरवासीय तसेच बाहेरून येणाऱ्या भाविकांची पर्वणी सुसह्य होण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे पोलीस-प्रशासनाने जाहीर केले असले तरी, त्यातून अनेक प्रश्न अनुत्तरितच राहत असून, त्यातील काही निवडक प्रश्न पुढीलप्रमाणे -
चारपट भाविक दुसऱ्या पर्वणीला येणार असतील व पहिल्या पर्वणीला जर एकच पट भाविक येणार असल्याचे माहीत असून, पोलिसांनी चोख (?) नियोजन केल्याचे मानले जात असेल तर चारपट भाविकांच्या सुरक्षिततेसाठी साहजिकच नियोजनात आणखी बदल करावा लागेल. असा बदल करताना भाविकांना अधिकाधिक मोकळी दिली जाईल की, आहे तोच बंदोबस्त व बॅरिकेडिंग आणखी आवळली जाईल?
समजा बॅरिकेडिंग कमी केली तरी पहिल्या पर्वणीला (नाशिकरोड वगळता) भाविकांसाठी जे मार्ग ठेवण्यात आले, त्यात कोणताही बदल जर केलेला नाही तर भाविकांची पायपीट कशी कमी होईल?
ज्या मार्गावरून भाविक जातील त्यांच्या सुरक्षिततेसाठी मार्ग निर्विघ्न ठेवण्यासाठी वाहनांना बंदी घालणार की नाही? भाविक मार्गाला जोडणारे उपरस्ते बंद राहणार की खुले?
भाविक मार्गावर नाशिककरांना प्रवेश करता येईल की नाही?
जर नाशिककर भाविक मार्गावर प्रवेश करू शकतील तर या मार्गाला जोडणारे रस्ते बॅरिकेडिंग मुक्त असतील की नाही?
प्रशासकीय मार्गात फेरबदल केले जातील की आहे तोच मार्ग वापरला जाईल?
जर प्रशासकीय मार्ग भाविक व नाशिककरांसाठी खुला केला जाईल तर मग आपत्कालीन परिस्थितीत कोणता मार्ग अवलंबला जाईल?
पुणे म्हणजेच चिंचोली / मोहगाव बाह्य वाहनतळावरून थेट महामार्ग बसस्थानकावर येणारे भाविक व रेल्वेने येणारे भाविक जर लक्ष्मणघाटावर स्नानासाठी जातील तर दसक घाटाचा घाट कशासाठी?
नाशिकरोडचे भाविक, धुळे, दिंडोरी, त्र्यंबक व मुंबईकडून येणारे भाविक जर द्वारकामार्गे लक्ष्मीनारायण घाटावर स्नानासाठी जातील तर या घाटावर गर्दी होणार नाही का?
या घाटावर गर्दी वाढली तर पुन्हा भाविकांना आल्या पावली पिटाळणार का?
चिंचोली - मोहशिवारातील भाविकांना मुंबईनाक्यापासून पायपीट, तर रेल्वेने आलेल्यांना थेट द्वारकापर्यंत वाहन सौख्य मिळणार असेल तर अन्य मार्गाने येणाऱ्या भाविकांवर पायपिटीचा अन्याय कशाला?
त्र्यंबकेश्वरकडून येणाऱ्या भाविकांसाठी सातपूर हा एकमेव मार्गच असेल, तर मग या मार्गावरून नाशिककर सुखनैव विहार करू शकतील काय?