शिवसेनेला आव्हान देण्याचा प्रयत्न यशस्वी ठरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:17 IST2021-09-24T04:17:14+5:302021-09-24T04:17:14+5:30

सातपूर : भाजपाची शहरभर लाट असतानाही ती रोखून चारीही जागांवर बाजी मारणाऱ्या शिवसेनेने यंदा अधिक जाेमाने तयारी केली असली ...

Will the attempt to challenge Shiv Sena be successful? | शिवसेनेला आव्हान देण्याचा प्रयत्न यशस्वी ठरणार?

शिवसेनेला आव्हान देण्याचा प्रयत्न यशस्वी ठरणार?

सातपूर : भाजपाची शहरभर लाट असतानाही ती रोखून चारीही जागांवर बाजी मारणाऱ्या शिवसेनेने यंदा अधिक जाेमाने तयारी केली असली तरी यंदाही भाजपच अधिक आव्हान देण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी भाजपा नगरसेवक दिनकर पाटील यांचे पुत्र अमोल पाटील आणि शिवसेनेचे विलास शिंदे या मामा भाच्याच्या लढतीकडे शहराचे लक्ष वेधले होते. पण मतदारांनी भाजपाला नाकारून शिवसेनेकडे एकहाती सत्ता सोपविली होती. आताही पुन्हा प्रभागात प्रतिष्ठेची लढत होण्याची शक्यता आहे. आनंदवल्ली- गंगापूर हा खरे तर शिवसेनेचा बालेकिल्ला. मात्र, प्रभाग रचनेच्या वेगवेगळ्या प्रयोगात एकेकाळी काँग्रेस- राष्ट्रवादीनेदेखील संधी घेतली आहे. गेल्या निवडणुकीत सर्वसाधारण गटातून शिंदे यांना शह देण्यासाठी नगरसेवक दिनकर पाटील यांचे पुत्र अमोल पाटील भाजपाकडून निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यावेळी आप्तेष्टांची लढत रंजक ठरली असली तरी अमोल पाटील यांना पराभूत करण्यात स्वकियांचा वाटा अधिक असल्याचे देखील पुढे आले होते. यंदाही पराभवाचे उट्टे काढण्यासाठी ते मैदानात उतरण्याची शक्यता असली तरी प्रभाग रचनेवर बरेच अवलंबून आहे. अनुसूचित जमाती महिला गटात भाजपाकडून रेखा बेंडकुळे, शिवसेनेकडून राधा बेंडकोळी, काँग्रेसकडून शोभा भोये तर माजी नगरसेविका उषा बेंडकोळी यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. यात चुरशीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या नयना गांगुर्डे यांनी बाजी मारली. तर सर्वसाधारण गटातून शिवसेनेचे संतोष गायकवाड, भाजपचे अशोक जाधव, काँग्रेसचे सचिन मंडलिक अशा लढतीत गायकवाड यांनी बाजी मारली. काॅंग्रेसचे अशोक जाधव यांनी भाजपात प्रवेश करून लाटेवर स्वार होण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो अपयशी ठरला.

अर्थात विलास शिंदे यांचे नेतृत्व असल्याने पक्षाने त्यांना गटनेतापदावर नियुक्त केले. पक्षाच्या तिन्ही नगरसेवकांनी आपापले प्रभाव क्षेत्र कायम ठेवले असले तरी बदलती राजकीय समीकरणे सोपी नाहीत. भाजपाकडून अमोल पाटील, आमदार कन्या रश्मी बेंडाळे यांच्यासह अन्य दावेदार असून त्यामुळे निवडणूक सेनेला सोपी नाही.

इन्फो..

आनंदवल्ली येथील मनपा शाळेजवळ प्रचंड रहदारी असल्याने स्कायवॉक करणे गरजेचे होते. आजूबाजूच्या १६ खेड्यांसाठी गंगापूर गावातील मनपा दवाखाना संजीवनी ठरणार असल्याने त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पाच कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या गोदावरी परिचय उद्यानाची दुरवस्था झाली आहे. अमरधामदेखील ‘जैसे थे’ असल्याने विकासाची अपेक्षा काय करायची?

-अमोल दिनकर पाटील, पराभूत उमेदवार.

प्रभागातील समस्या

- महत्त्वाकांक्षी गोदावरी परिचय उद्यानाची दुरवस्था.

- मातोश्री मीनाताई ठाकरे उद्यान माेजते अखेरची घटका

- गंगापूर रस्त्यालगत कॅनॉल रस्त्याचे रुंदीकरण प्रलंबित आहे.

- पाईपलाईन रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत.

संभाव्य उमेदवार

शिवसेना - विलास शिंदे, संतोष गायकवाड, नयना गांगुर्डे, योगिता आहेर, कैलास जाधव,

भाजपा :- ॲड. महेंद्र शिंदे, रश्मी हिरे-बेंडाळे, सतीश घैसास, दीपक आरोटे, अशोक जाधव, शरद काळे

राष्ट्रवादी :- डॉ. अमोल वाजे, प्रवीण पाटील, मुन्ना कडलग, शिवाजी मटाले, प्रवीण अहिरे, योगेश बेंडकुळे, नंदकिशोर शेवरे,

----

छायाचित्र विलास शिंदे, अमोल पाटील

Web Title: Will the attempt to challenge Shiv Sena be successful?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.