येवल्यात युरियासाठी प्रहार करणार, अर्धनग्न ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:15 IST2021-07-27T04:15:23+5:302021-07-27T04:15:23+5:30

प्रांताधिकारी कार्यालयात निवासी नायब तहसीलदार नवनाथ दाते यांना निवेदन देण्यात आले. तालुक्यातील शेतकरी गेल्या दीड महिन्यापासून युरियासाठी वणवण फिरत ...

Will attack for urea in Yeola, half-naked sit-in movement | येवल्यात युरियासाठी प्रहार करणार, अर्धनग्न ठिय्या आंदोलन

येवल्यात युरियासाठी प्रहार करणार, अर्धनग्न ठिय्या आंदोलन

प्रांताधिकारी कार्यालयात निवासी नायब तहसीलदार नवनाथ दाते यांना निवेदन देण्यात आले. तालुक्यातील शेतकरी गेल्या दीड महिन्यापासून युरियासाठी वणवण फिरत असून तालुका कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळे उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली आहे. तालुक्यात मका, सोयाबीन, बाजरी, तूर ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जात असून सध्या सर्वच पिके वाढीच्या अवस्थेत असल्याने त्यांना नत्रयुक्त खतांची तातडीची गरज आहे. परंतु, कृषीविभागाच्या ढिसाळ धोरणामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतक-यांची लूट होत असून २६६ रुपयांच्या एक गोणीबरोबर १४०० रुपये किमतीची दुसऱ्या खताची गोणी घेण्याची सक्ती दुकानदारांकडून केली जात असून ही शेतक-यांची दिवसाढवळ्या लूट सर्व शासकीय यंत्रणेच्या साक्षीने होत असल्याचे सदर निवेदनात म्हटले आहे.

कंपनीकडूनच लिंकिंग होत असून पुरेसा साठा मिळत नसल्याने टंचाई निर्माण होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. कृषी अधिका-यांशी चर्चा केली असता शेतकऱ्यांनी युरिया जास्त न वापरता इतर खते वापरावी, युरिया वापरल्याने जमीन, पाणी दूषित होते, असे उपदेशाचे डोस पाजले जातात. वास्तविक, शेतकऱ्यासारखा उत्कृष्ट संशोधक दुसरा कुणी नसून अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना अक्कल न शिकविता आपणास नेमून दिलेली कामे करावीत, असेही सदर निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर प्रहारचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, वसंत झांबरे, किरण चरमळ, रामभाऊ नाईकवाडे, सुनील पाचपुते, जगदीश गायकवाड, पांडुरंग शेलार, भाऊसाहेब पाचपुते आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Will attack for urea in Yeola, half-naked sit-in movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.