पोहीत जंगली श्वापदाचा हल्ला
By Admin | Updated: October 23, 2016 22:41 IST2016-10-23T22:40:58+5:302016-10-23T22:41:40+5:30
नांदगाव : चौघे जखमी, परिसरात घबराट

पोहीत जंगली श्वापदाचा हल्ला
नांदगाव : नांदगाव तालुक्यातील पोही येथे रात्री अज्ञात जंगली श्वापदाने केलेल्या हल्ल्यात चार जण जखमी झाल्याची घटना घडली. जखमी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल असून, पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे. हल्ल्यात एके ठिकाणी काका-पुतण्या व दुसरीकडे सासरा-सून जखमी झाले आहेत.
पोही येथील रघुनाथ कोते (७०), श्रावण मोरे (६०), संजय मोरे (२७), ललिता कोते (२३) जखमी झाले असून, त्यांच्यावर डॉ. रोहन बोरसे व डॉ. प्रशांत जुन्नरे उपचार करीत आहेत.
हल्ला झालेल्या मोरे व कोते यांच्या घरांमध्ये सुमारे ४०० मीटर्स अंतर असून, या दोन ठिकाणी हल्ला झाला. रात्री कोपीच्या बाहेर बाजरीशेजारी वरील मंडळी झोपली असताना हा प्रकार घडला. मोरे कुटुंबीयातले काका व पुतण्या यांनी काठ्यांनी जोरदार प्रतिकार केला. पण तो कुत्रासदृश प्राणी पुन्हा पुन्हा अंगावर धावून येत होता, अशी माहिती संजय मोरे यांनी दिली. मोरे यांच्या जबरदस्त प्रतिकारापुढे थोड्या वेळाने माघार घेत त्याने काही अंतरावर झोपलेल्या कोते यांच्यावर हल्ला चढविला. रघुनाथ कोते यांनी हिंमत करून सून ललिता हिला कोपऱ्यातले दांडके आणायला सांगितले. त्यांनी दोन चार दांडके त्या प्राण्याच्या पाठीत घातले. मग मात्र तो प्राणी पळून गेला. पण तोपर्यंत रघुनाथ चांगलेच जखमी झाले होते. ते ७० वर्षांचे आहेत. वयाच्या मानाने त्यांनी जबरदस्त झुंज दिली. त्यांना पस्तीस टाके घालण्यात आले आहेत. इतरांना देखील कमी अधिक प्रमाणात टाके घालण्यात आले आहेत, तर ललिता हिने कोंबड्यांच्या खुराड्यास त्या प्राण्याने बाजूला ढकलून दिल्याची माहिती दिली. वनविभागाचे वनक्षेत्रपाल विक्रम आहिरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण नाशिक येथे असून, वनपाल भालेराव व वनरक्षक सुरेखा खाजे यांना जागेवर पंचनामा करण्यासाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती दिली.
जिल्हा रुग्णालयात रेबीपोरआयजीएम हे औषध असते. म्हणून जखमींना नाशिक येथे हलविण्यात येनार असल्याची माहिती डॉ. बोरसे व डॉ. जुन्नरे यांनी दिली. (वार्ताहर)
काही वर्षांपूवी तालुक्यातील जळगाव बु. येथे बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्यात प्रशासकीय दिरंगाईने ग्रामस्थ चिडल्याने दंगलसदृश परिस्थिती निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. पोही ग्रामस्थांमध्ये या घटनेमुळे दहशत निर्माण झाली आहे.
जंगली श्वापद बिबट्या की लांडगा की तरस याबाबतीत वेगवेगळी माहिती मिळाली. हल्ल्यात जखमी झालेल्यांना तो प्राणी बिबट्या असल्याचा संशय आहे, तर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सच्या मते तो लांडगा किंवा तत्सम प्राणी असण्याची शक्यता आहे. वनपाल वाल्मीक भालेराव यांनी तो जंगली कुत्रा असण्याची शक्यता वर्तवली आहे.