वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी रुंदीकरणाचा प्रस्ताव
By Admin | Updated: November 11, 2014 00:50 IST2014-11-11T00:44:01+5:302014-11-11T00:50:15+5:30
वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी रुंदीकरणाचा प्रस्ताव

वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी रुंदीकरणाचा प्रस्ताव
नाशिक : शहरातील अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोकस्तंभ-रविवार कारंजा रस्त्याच्या कॉँक्रिटीकरणाचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले असून, या पार्श्वभूमीवर येथील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी रुंदीकरणाचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला होता; मात्र रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत विरोधाच्या भूमिकेवर येथील मिळकतधारक व व्यापारी वर्ग ठाम असून, सोमवारी (दि. १०) झालेल्या अधिकारी आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीमध्येही उपस्थितांनी रुंदीकरणाच्या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविण्यात आला.विकास आराखड्यामध्ये रविवार पेठ रस्ता रुंदीकरण व कॉँक्रिटीकरणाचा प्रस्ताव असून, सुमारे पंधरा मीटरपर्यंत हा रस्ता विकास आराखड्यामध्ये दाखविण्यात आला आहे; मात्र दुतर्फा असलेली व्यापाऱ्यांची दुकाने व रहिवाशांची घरे यामुळे सद्यस्थितीत रस्ता केवळ आठ मीटरपर्यंत उपलब्ध असून, तोदेखील अशोकस्तंभ ते रविवार कारंजापर्यंत कमी अधिक असल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जेवढा रस्ता उपलब्ध होईल तेवढ्या जागेचे अन्य सोयीसुविधांसाठी जागा सोडून कॉँक्रिटीकरणाच्या कामाला तातडीने सुरुवात के ली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाने बैठकीमध्ये स्पष्ट केले. कॉँक्रिटीकरणादरम्यान कोणत्याही प्रकारची सक्ती व्यापारी व रहिवाशांवर केली जाणार नाही. जेवढी जागा मिळेल त्या जागेवर रस्त्याचे कॉँक्रिटीकरण करण्यात येईल. जर कोणी स्वेच्छेने जागा उपलब्ध करून दिली तर महापालिका संबंधितांचे स्वागत करेल व त्या ठिकाणी शक्य असल्यास कॉँक्रिटीकरण किंवा पेव्हर ब्लॉक बसविले जातील, असे माजी महापौर अॅड. यतिन वाघ यांनी स्पष्ट केले. व्यापारी, मिळकतधारक व महापालिका अधिकाऱ्यांच्या झालेल्या संयुक्त बैठकीमध्ये व्यापाऱ्यांनी आपली मते मांडली. यावेळी बहुसंख्य व्यापाऱ्यांनी रस्ता रुंदीकरणाला हरकत घेत विरोध दर्शविला, तर बोटावर मोजण्याइतक्या व्यापाऱ्यांनी व रहिवाशांनी रस्ता रुंदीकरणाचे समर्थन केले. (प्रतिनिधी)