प्रतिष्ठानच्या रिक्त जागेवर कोणाची वर्णी?

By Admin | Updated: July 8, 2014 00:52 IST2014-07-08T00:05:42+5:302014-07-08T00:52:31+5:30

प्रतिष्ठानच्या रिक्त जागेवर कोणाची वर्णी?

Whose place in the vacant place of the establishment? | प्रतिष्ठानच्या रिक्त जागेवर कोणाची वर्णी?

प्रतिष्ठानच्या रिक्त जागेवर कोणाची वर्णी?

 

नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांची विश्वस्तपदाची मुदत संपल्याने रिक्त झालेल्या जागेवर आता कोणाची वर्णी लागते, याबाबत साहित्यवर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मात्र, रिक्त जागेवर बाहेरच्या व्यक्तींना स्थान देण्याऐवजी स्थानिक कलावंतांना संधी देण्याचा सूर निघत आहे.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांची विश्वस्तपदाची मुदत २५ जून रोजी संपुष्टात आली. पटेल हे अध्यक्षपदाची धुरा सांभाळत असल्याने विश्वस्त मंडळाने मागील महिन्यातच अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांची नियुक्ती केली होती. याशिवाय आणखी एका रिक्त पदावर ‘मराठी बाणा’चे प्रवर्तक व कलावंत अशोक हांडे यांचीही वर्णी लावण्यात आली होती. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रंजना पाटील व प्रा. हर्षवर्धन कडेपूरकर यांच्या जागा रिक्त होत्या. त्या जागांवर मधु मंगेश कर्णिक आणि अशोक हांडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता डॉ. जब्बार पटेल यांची जागा रिक्त झाली आहे. डॉ. पटेल यांचा विश्वस्तपदाचा दहा वर्षांचा कालावधी २५ जून रोजी संपुष्टात आला.
प्रतिष्ठानच्या घटनेनुसार विश्वस्तपदाचा कालावधी पाच वर्षांचा आहे. परंतु त्याला आणखी पाच वर्षांची मुदतवाढ देता येऊ शकते. मात्र, दहा वर्षांनंतर पुन्हा विश्वस्त मंडळावर राहता येत नाही. पटेल यांची जागा रिक्त झाल्याने सदर जागेवर आता बाहेरच्या व्यक्तींऐवजी स्थानिक कलावंतांना संधी द्यावी, अशी चर्चा साहित्यवर्तुळात होऊ लागली आहे.
प्रतिष्ठानच्या विश्वस्तपदी यापूर्वी ज्या बाहेरच्या व्यक्ती विराजमान झाल्या त्यातील काही सन्माननीय अपवाद वगळता इतरांकडून प्रतिष्ठानला फारसे योगदान लाभू शकलेले नाही. पटेल यांच्या रिक्त जागेवर विश्वस्त मंडळाकडून पुन्हा एकदा बाहेरील व्यक्तीला स्थान देण्याची शक्यता गृहीत धरून साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील काही संस्था व व्यक्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षांची भेट घेऊन स्थानिक कलावंतांना संधी देण्याची मागणी करणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Whose place in the vacant place of the establishment?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.