ज्यांच्यावर मदार, त्यांनाच ठरवले नादार!

By Admin | Updated: August 9, 2015 00:08 IST2015-08-09T00:08:08+5:302015-08-09T00:08:25+5:30

सुविधांची बोंब : पाचशे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पलायन, आणखी जाण्याच्या तयारीत; वेतनही शंभर रुपयांनी कमी

On whom the Madar, they have decided not! | ज्यांच्यावर मदार, त्यांनाच ठरवले नादार!

ज्यांच्यावर मदार, त्यांनाच ठरवले नादार!

सुदीप गुजराथी : नाशिक
कुंभकाळातील स्वच्छतेसाठी उत्तर प्रदेशातून दाखल झालेल्या अठराशे ते दोन हजार कर्मचाऱ्यांपैकी पाचशे कर्मचाऱ्यांनी असुविधांना वैतागून चक्क पलायन केले असल्याची बाब समोर आली आहे. निवास, शौचालयाची सुविधा नसल्याने या कर्मचाऱ्यांनी नाशिक सोडले असून, त्यांना वेतनही प्रतिदिन शंभर रुपयांनी कमी मिळत असल्याची तक्रार होत आहे. दरम्यान, अव्यवस्थेमुळे आणखी शेकडो कर्मचारी निघून जाण्याच्या तयारीत असल्याने कुंभमेळ्यातील स्वच्छतेसह नाशिककरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
चार ठेकेदारांमार्फत प्रशासनाने उत्तर प्रदेशातील सफाई कर्मचाऱ्यांना नाशकात बोलावले आहे. अलाहाबाद, बांदा व फतेहपूर जिल्ह्यांतील या कर्मचाऱ्यांकडे साधुग्राममधील शौचालयांची स्वच्छता, झाडू मारणे व कचरा उचलण्याचे काम देण्यात आले आहे. तसेच पर्वणीकाळात रामकुंड व परिसर स्वच्छतेची जबाबदारीही त्यांच्याकडेच राहणार आहे. नाशकात आल्यानंतर प्रारंभीचे काही दिवस या कर्मचाऱ्यांना उघड्यावरच राहावे लागले. नंतर काहींना झोपड्या उभारण्यासाठी नुसते मेणकापड देण्यात आले. या कर्मचाऱ्यांनी साधुग्राममधील सेक्टर दोनमध्ये नाल्याच्या कडेला झोपड्या उभारले; पण तेथे त्यांना ठेकेदाराने वीज, पाण्यासह अन्य कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. झोपड्या दोन्ही बाजूंनी मोकळ्या असल्याने पावसाचे पाणी आत येते. त्याला अटकाव घालण्यासाठी प्लॅस्टिकही पुरवण्यात आलेले नाही. अखेर या कर्मचाऱ्यांनीच साड्या लावून झोपड्या बंद केल्या आहेत. या कर्मचाऱ्यांना चहा, नाश्ता, भोजन, निवासासह सर्व सुविधा पुरवणे बंधनकारक आहे; मात्र अक्षरश: वाऱ्यावर सोडून देण्यात आल्याने त्यांना दगडाच्या चुलीवर अन्न शिजवावे लागत आहे. त्यामुळे सुमारे पाचशे कर्मचारी शहर सोडून निघून गेले असून, उर्वरित कर्मचारीही पलायनाच्या तयारीत आहेत. कुंभकाळात ज्यांच्यावर स्वच्छतेची मदार आहे, त्यांनाच वाऱ्यावर सोडल्याने अस्वच्छता वाढून नाशिककरांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होणार आहे.
 

Web Title: On whom the Madar, they have decided not!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.