रामपाल बाबाला ‘नाम’ कोण देणार?
By Admin | Updated: November 23, 2014 23:49 IST2014-11-23T23:49:09+5:302014-11-23T23:49:51+5:30
कळीचा प्रश्न : भक्तांवर दैनंदिन जीवनात लादले होते अनेक निर्बंध

रामपाल बाबाला ‘नाम’ कोण देणार?
नाशिक : तुम्ही चित्रपट पाहू नका, माझ्याशिवाय इतरांची पूजा करू नका, डोक्याला काळे लावू नका, अवैध धंदे करू नका, जर असे काही (चुकून) घडल्यास आश्रमात या, मी तुम्हाला माफी (आश्रमाच्या भाषेत नाम) देतो म्हणजे तुम्ही पापमुक्त (?) व्हाल, असा संदेश भक्तांना देणाऱ्या रामपाल बाबावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता रामपाल बाबाला त्यापासून कोण वाचविणार अर्थात ‘नाम’ कोण देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नाशिकमध्ये रामपाल बाबाचे शेकडो भक्त आहेत. त्यात तरुणांचे प्रमाणही लक्षवेधी आहे. अशा भगतजींच्या घरी अथवा दुकानात गेल्यास केवळ रामपाल बाबाचे भलेमोठे चित्र लावलेले दिसायचे आणि रामपाल यांनी तयार केलेली आरती रोज सायंकाळी ७ वाजता ध्वनिफितीद्वारे वाजविली जायची. सर्व देवांचा देव असणाऱ्या कुबेराचाच मी भक्त असल्याने केवळ माझीच पूजा करा, असे सांगणाऱ्या रामपाल बाबाने भक्तांवर अनेक निर्बंध लादले होते. त्यात खोटे बोलू नये असेही सांगण्यात आले होते. या निर्बंधांपैकी कोणत्याही नियमाचा भंग झाल्यास त्याची माफी मागण्यासाठी आश्रमात जावे लागत होते. आश्रमात गेल्यानंतर काही सेवा (प्रार्थना, जप) केल्यानंतर रामपाल बाबा भक्तांना जप करण्यासाठी मंत्र अर्थात नाम द्यायचे. त्यामुळे मागील घटना विसरायची आणि नव्याने सेवेकडे वळायचे असा त्याचा अर्थ घेतला जात होता.
आश्रमाबाहेर पोलिसांनी सलग तीन दिवस बाबाला पकडण्यासाठी तळ ठोकला असताना बाबा आश्रमात नाहीत असे पोलिसांना सांगणाऱ्या भक्तांनी आणि स्वत: रामपाल बाबानेही खोटे बोलून स्वत:च्याच शिकवणीचा एकप्रकारे भंगच केला. त्यामुळे आता त्यांचे तपोबल एकप्रकारे स्पष्टच झाले आहे. त्यामुळे या भक्तांना आता नाम कोण देणार आणि खुद्द रामपाल बाबाच आश्रमातून पोलिसांना मिळून आल्याने त्याला तरी नाम कोण देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)