मतांच्या खिचडीचा फायदा कोणाला होणार?
By Admin | Updated: November 16, 2016 23:12 IST2016-11-16T23:13:46+5:302016-11-16T23:12:13+5:30
मतांच्या खिचडीचा फायदा कोणाला होणार?

मतांच्या खिचडीचा फायदा कोणाला होणार?
नांदगाव : येथील प्रभाग क्र. ३ राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. येथून नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवार कल्पना वाघ नशीब आजमावत आहेत, तर शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार येथील मतांच्या गणितावर डोळा ठेवून आहेत. त्यामुळे येथे मतांची खिचडी झाली आहे.
येथून पुढील उमेदवार रिंगणात आहेत. करुणा जाधव (अ) (काँग्रेस), निर्मला केदारे (अ) (भाजप), कामिनी साळवे (अ) (शिवसेना), साक्षी आहिरे (राष्ट्रवादी), सचिन देवकाते (ब) (राष्ट्रवादी), राजेंद्र गांगुर्डे (ब) (भाजप), कारभारी शिंदे (ब) (शिवसेना), देवीदास भोपळे (भाकप), संतोष वाघ (अपक्ष).येथील जातीनिहाय मतबहुलता व मानसिकता लक्षात घेऊन पक्ष
व आघाडीने उमेदवार दिले आहेत. परंतु राजकीय महत्वाकांक्षा असलेले इच्छुक उमेदवार व निवडणुकीतल्या गोंधळाला
सामोरे जाण्याची मानसिकता नसल्याने घरी बसलेले उमेदवार यामुळे येथील समीकरणे क्लिष्ट झाली आहेत.
मुख्यत्वेकरुन धनगर, दलित या मतविभागणीवर अवलंबून राहून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी येथे जी गणिते मांडून उमेदवार दिले. ती प्रमेये सिध्द करण्यासाठी, इच्छुक उमेदवारांची कसोटी लागणार आहे.
शिवसेनेने वरची मते मिळविण्यासाठी कारभारी शिंदे व कामिनी साळवे यांना उमेदवारी दिली. ती या दोघांचे त्या त्या समाजातील वजन व कर्तबगारी बघून दिली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील शिंदे यांच्याविरुध्द सचिन देवकाते यांची उमेदवारी दिली. दोघे ही धनगर समाजाचे प्रतिनिधी आहेत.
नगरपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होत असते. पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी ज्या जातीय समीकरणांच्या आधारावर प्रभागातून उमेदवाऱ्या दिल्या. त्यांना नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील (ते ही धनगर समाजाचे) यांचा किती मतांचा दणका बसेल. हे भाकीत करण्यासाठी ज्योतिषाची आवश्यकता नाही. शिवाय ३ अ मध्ये शिवसेनेच्या कामिनी साळवे व कांग्रेसच्या करुणा जाधव यांच्यात लढत असल्याचे सांगितले जाते. येथेच राष्ट्रवादीने साक्षी आहिरे यांना उमेदवारी दिली आहे.
आठ पैकी सात प्रभागात काँंग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी असली तरी येथे प्रभाग क्र. ३ मध्ये ती तुटल्याचे मतपत्रिकेवर दिसून येणार आहे. आघाडी म्हणते आमची उमेदवार करुणा मग साक्षी त्यात नाही का? असा प्रश्न निर्माण होतो. मैत्रीपूर्ण लढत असे ही म्हटले जात नाही. येथे आघाडीच्या दोन्ही पक्षांची अडचणच झाली आहे.
साक्षी अहिरे यांच पती विश्वास अहिरे विद्यमान नगरपरिषदेत राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. राष्ट्रवादीचे तिकीट नाकारल्याने त्यांनी अपक्षाचा झेंडा हाती घेतला. मग मात्र पक्षचे पदाधिकारी नमले आणि साक्षींना उमेदवारी जाहीर केली. (वार्ताहर)