बंडखोरांचा फटका कोणाला?
By Admin | Updated: February 17, 2017 23:57 IST2017-02-17T23:57:38+5:302017-02-17T23:57:57+5:30
बंडखोरांचा फटका कोणाला?

बंडखोरांचा फटका कोणाला?
नरेंद्र दंडगव्हाळ : सिडको
निवडणुकीच्या रिंगणात सर्वांनीच मारलेली उडी व त्यातच बंडखोरांनी अधिकृत उमेदवारांच्या विरोधात दिलेले आव्हान पाहता, सर्वच उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, बंडखोरांचा फटका कोणाला बसतो याकडे प्रभाग क्रमांक २९ चे लक्ष लागले आहे. सिडकोतील सध्याच्या प्रभाग क्रमांक ४३, ४४, ४५ चा भाग मिळून नवीन प्रभाग क्रमांक २९ तयार झाला असून, त्यात प्रामुख्याने पवननगर, लोकमान्यनगर, गणेश चौक, विजयनगर, तानाजी चौक, स्वामी विवेकानंद चौक, उत्तमनगर या भागाचा समावेश आहे. ‘अ’ या नागरिकांच्या मागास वर्ग महिला गटात सेना, भाजप व राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत होत असून, त्यात बंडखोरांमुळे आणखीच चुरस निर्माण झाली आहे. शिवसेनेकडून माजी नगरसेवक सुमनताई वामन सोनवणे यांना तर भाजपाने छायाताई दिलीप देवांग यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसने मनीषा मनोज हिरे यांना तसेच मनसेने वर्षा अरुण वेताळ यांना रिंगणात उतरविले आहे. भाजपाकडून इच्छुक असलेल्या, परंतु उमेदवारी न मिळालेल्या डॉ. मंजूषा दराडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केल्याने त्याचा फायदा तोटा कोणाला होतो, हे महत्त्वाचे आहे. ‘ब’ सर्वसाधारण महिला गटातून सेनेने विद्यमान नगरसेवक रत्नमाला सुरेश राणे यांना उमेदवारी दिली आहे. गत निवडणुकीत राणे या मनसेकडून निवडून आल्या होत्या. भाजपाकडून संगीता शिवाजी बरके, कॉँग्रेसकडून मीराताई अरविंद सावळे, मनसेकडून ज्योती प्रकाश शिंदे, माकपाकडून विमल विष्णू पोरजे हे अधिकृत उमेदवार असून, भाजपाकडून उमेदवारी व एबी फॉर्म मिळूनही पक्षाने ऐनवेळी पत्ता कापल्याने नाराज झालेल्या सोनल संदीप मंडलेचा यांनी बंडखोरी करून अपक्ष अर्ज भरला आहे, त्याचबरोबर द्वारका गोसावी यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवली आहे. ‘क’ या सर्वसाधारण खुल्या गटातून कॉँग्रेसकडून विद्यमान नगरसेवक लक्ष्मण जायभावे तर सेनेकडून विद्यमान नगरसेवक अरविंद शेळके हे उमेदवारी करीत आहेत. भाजपाने युवा मोर्चाचे अध्यक्ष मुकेश सहाणे यांना उमेदवारी दिली असून, मनसेकडून सागर कडभाने हे रिंगणात आहेत. नगरसेवक शेळके यांनी निवडणुकीच्या तोंडावर मनसेतून सेनेत प्रवेश केला, परिणामी सेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने देवा वाघमारे यांनी बंडखोरी करून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला, त्याचप्रमाणे सुरेश पवार व महेश देवरे हेदेखील अपक्ष नशीब आजमावित आहेत. ‘ड’ सर्वसाधारण खुल्या गटातून राष्ट्रवादीकडून अमोल नामदेव महाले यांना तर सेनेने माजी नगरसेवक सतीश खैरनार यांना रिंगणात उतरविले आहे. भाजपाकडून नीलेश ठाकरे हे नशीब आजमावित आहेत. मनसेकडून नितीन माळी, माकपाचे संतोष काकडे, भारतीय संग्राम परिषदेकडून मंगेश क्षीरसागर, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाकडून विवेक तांबे व अपक्ष मनोहर काळे हे रिंगणात आहेत. या प्रभागात कॉँग्रेस आघाडी एकत्र लढत आहे, तर सेना-भाजपा परस्पर विरोधात ठाकली असून, मनसेची स्वतंत्र वाटचाल सुरू आहे, अशा परिस्थितीत बंडखोरांनी स्वकीयांनाच अडचणीत आणल्यामुळे प्रभागातील लढत चुरशीची होत आहे.