फुटिरांसाठी पक्षांचा ‘व्हिप’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2016 00:25 IST2016-04-11T23:19:56+5:302016-04-12T00:25:53+5:30
प्रभाग सभापती : नाशिकरोड, सिडको, सातपूरसाठी आज निवडणूक

फुटिरांसाठी पक्षांचा ‘व्हिप’
नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारणाऱ्या आणि काही कुंपणावर असलेल्या फुटिरांची कोंडी करण्यासाठी मंगळवारी (दि.१२) होणाऱ्या प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीकरिता सर्वच राजकीय पक्षांनी सावध भूमिका घेतली असून, अधिकृत उमेदवारालाच मतदान करण्यासंबंधी सदस्यांना ‘व्हिप’ बजावला जाणार आहे. दरम्यान, मंगळवारी नाशिकरोड, सिडको आणि सातपूर प्रभाग सभापतिपदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.
मंगळवारी सकाळी १०.३० वाजता सातपूर, दुपारी १२ वाजता सिडको आणि ४ वाजता नाशिकरोड प्रभाग समिती सभापतिपदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यांत पक्षांतराचे जोरदार वारे वाहत असल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. प्रामुख्याने सत्ताधारी मनसेला मोठ्या प्रमाणावर खिंडार पडले असून, आतापर्यंत ३९ पैकी १२ नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकलेला आहे. याशिवाय, कॉँग्रेस, माकपा आणि राष्ट्रवादीलाही बंडखोरीची लागण झालेली आहे.
मनसेचे नाशिकरोड येथील नगरसेवक नीलेश शेलार व शोभना शिंदे यांनी महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षादेश झुगारून मतदान केले शिवाय सेनेत प्रवेश केला. त्यामुळे मनसेच्या तक्रारीनंतर विभागीय आयुक्तांनी दोहोंचे सदस्यत्व अपात्र ठरविण्याचा नुकताच निकाल दिलेला आहे.
या अपात्रतेच्या कारवाईचा बंडखोरांनी धसका घेतला आहे.
दि. १२ व १३ रोजी होणाऱ्या प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत मनसेसह सर्वच पक्ष आपल्या सदस्यांना व्हिप बजावणार असून, त्यामुळे फुटिरांची कोंडी होणार आहे. सातपूर प्रभागात माकपाच्या नंदिनी जाधव यांनी सेनेत, तर सचिन भोर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. सिडको प्रभागात मनसेचे अरविंद शेळके व रत्नमाला राणे यांनी सेनेत प्रवेश केला आहे, तर जनराज्य आघाडीचे दोन सदस्य यापूर्वीच भाजपात दाखल झालेले आहेत. नाशिकरोड प्रभागात मनसेचे शोभना शिंदे व नीलेश शेलार यांना अपात्र घोषित करण्यात आल्याने त्यांना मतदानात भाग घेता येणार नाही.