आमची ‘नंदिनी’ कुठे?
By Admin | Updated: May 17, 2015 01:46 IST2015-05-17T01:45:50+5:302015-05-17T01:46:13+5:30
आमची ‘नंदिनी’ कुठे?

आमची ‘नंदिनी’ कुठे?
नाशिक : माझ्या सहा मुलांमध्ये सर्वांत लहान नंदिनी़ केवळ चारच वर्षांची, कोण घेऊन गेले असेल तिला, कुठे असेल ती, जेवण केले असेल का? असे नानाविध प्रश्न सातपूर अंबड लिंकरोडवरील अपहृत बालिका नंदिनीचे आई-वडिलांनी केले आहेत़ नंदिनीच्या काळजीपोटी महेंद्र व प्रेमकली शर्मा यांच्या तोंडचे पाणी पळाले असून, लहान भाऊ कृष्णा तर सारखा बहिणीची आठवण काढतोय़ असे हे विदारक चित्र अंबड लिंकरोडवरील शर्मा कुटुंबीयांच्या घरी शनिवारी बघावयास मिळाले़ मुलीचे अपहरण होऊन चोवीस तास उलटूनही कोणताही तपास न लागल्याने या सर्वांचाच जीव भांड्यात पडला आहे़ सातपूर-अंबड लिंकरोडवरील बजरंगनगर परिसरातील एस्सार पेट्रोलपंपाशेजारी राहणाऱ्या महेंद्र शर्मा या फर्निचर व्यावसायिकाची चार वर्षांची मुलगी नंदिनी ही मोठ्या बहिणीसोबत शुक्रवारी सकाळी सव्वाआठ वाजेच्या सुमारास दुकानासमोर खेळत होती़ यावेळी पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या संशयितांनी ‘तुम्हारे पापा किधर है’ असे विचारले़ तेव्हा मोठी बहीण दुकानात गेली असता नंदिनीला कारमध्ये टाकून बळजबरीने पळवून नेले़ सुतारकाम करणारे महेंद्र शर्मा हे गेल्या अठरा वर्षांपासून नाशिकमध्ये राहत असून, पूर्वी रोजंदारीवर काम करायचे़ गेल्या तीन वर्षांपासून भाडेतत्त्वावर घेतलेल्या जागेवर त्यांनी स्वत:चा श्रीकृष्णा नावाने फर्निचरचा व्यवसाय सुरू केला़ महेंद्र शर्मा यांच्या कुटुंबामध्ये पत्नी प्रेमकली, मुली आराधना, अनुराधा, खुशबू, अंजली, नंदिनी व मुलगा कृष्णा असे आठ सदस्य आहेत़ कुणाशीही वैर नाही, भांडणतंटा नसल्याचे शर्मा कुटुंबीय सांगते़ त्यामुळे त्यांच्या चार वर्षीय मुलीचे कोणी व का अपहरण केले हा प्रश्न पोलिसांना पडला आहे़