घंटागाड्या गेल्या कुठे?
By Admin | Updated: October 14, 2015 22:29 IST2015-10-14T22:17:30+5:302015-10-14T22:29:01+5:30
घंटागाड्या गेल्या कुठे?

घंटागाड्या गेल्या कुठे?
सिडको : ऐन सणासुदीच्या दिवसात सिडको भागात घंटागाडी वेळेवर फिरकतच नसून, सिडको भागासाठी ११ प्रभाग मिळून २२ व दोन जादा अशा २४ घंटागाड्या दररोज प्रभागात फिरणे बंधनकारक आहे. परंतु प्रत्यक्षात घंटागाड्यांची संख्या कमी असताना सर्व घंटागाड्या हजर दाखविल्या जातात. यावरून यात मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार होत असल्याचे समजते.
सिडको प्रभागात घंटागाड्या वेळेवर न येणे, घंटागाडीच न येणे असे प्रकार तर सातत्याने होतच असतात. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने नागरिकांकडून घराची साफसफाई करण्यात येत आहे. यामुळे घंटागाडी फिरणे गरजेचे आहे. परंतु घंटागाडीचे रडगाणे सुरूच असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. घंटागाडी फिरकत नसल्याने नागरिकांना नाइलाजास्तव घरातील कचरा हा रस्त्यालगत तसेच मोकळ्या जागेत टाकावा लागत आहे. यावर घंटागाडीवर कोणाचाही अंकुश नसल्याने नागरिकांनी तक्रार करूनही फारसा उपयोग होत नसल्याचे दिसून येते. घंटागाड्यांची संख्या कमी असल्याने ज्या भागातून तक्रारी येतात त्या भागात दुसऱ्या प्रभागातील घंटागाडी पाठविली जाते. काही प्रभागात तर गेल्या अनेक दिवसांपासून घंटागाडीच नसल्याने दुसऱ्या प्रभागातील घंटागाडीचा वापर करण्यात येत असल्याचे समजते.
सिडको भागात गेल्या काही दिवसांपूर्वीच घंटागाडीच्या चाकाखाली एका लहान मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. परंतु यानंतरही प्रभागातील घंटागाड्यांची देखभाल केली जात नसल्याचे दिसून येते. प्रभागात सध्या ब्रेक नसलेली घंटागाडी फिरत असून यातून एखादी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याचे माजी नगरसेवक चंद्रकांत पांडे यांनी सांगितले. अनियमित घंटागाडीमुळे नागरिकांमध्ये संताप आहे. (वार्ताहर)
२४ पैकी फक्त ६ गाड्या सिडको प्रभागात एकूण अकरा प्रभागांसाठी २२ व जादा दोन अशा चोवीस घंटागाड्या देण्यात आलेल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात दररोज २४ घंटागाड्यांपैकी पाच ते सहा घंटागाड्या ह्या प्रभागात फिरकतच नसल्याचे समजते. यामुळे घंटागाडी येत नसल्याच्या तक्रारी वाढतच असल्याने प्रश्न निर्माण झाला आहे.