चोरी गेलेले दोन लाख प्रकट होतात तेव्हा...

By Admin | Updated: July 31, 2016 00:29 IST2016-07-31T00:22:53+5:302016-07-31T00:29:19+5:30

चोरी गेलेले दोन लाख प्रकट होतात तेव्हा...

When two lakhs of stolen were revealed ... | चोरी गेलेले दोन लाख प्रकट होतात तेव्हा...

चोरी गेलेले दोन लाख प्रकट होतात तेव्हा...

शैलेश कर्पे सिन्नर
वार : शनिवार.. वेळ : दुपारी १ वाजेची.. सत्तरी पार केलेला एक वयोवृद्ध नागरिक रडवलेल्या चेहऱ्याने पोलीस ठाण्याची पायरी चढतो.. हातातले पासबुक दाखवत म्हणतो.. साहेब, माझे बॅँकेतून दोन लाख रुपये लंपास झाले.. आता मी म्हातारा काय करू? पोलीस त्याच्या हातातील बॅँकेचे पासबुक पाहून खात्यातून दोन लाख रुपये काढल्याची नोंद पाहून त्याच्या बोलण्यात तथ्य असल्याचे मान्य करतात. मग सुरु होतो तपास...
आणि दोन तासातच चोरीचे गेलेले दोन लाख रुपये प्रकट झाल्याचे पाहून ‘हसावे की रडावे’ अशी सर्वांची अवस्था होते. मात्र वयोवृध्द नागरिकाचे चोरीला (न) गेलेले दोन लाख रुपये पुन्हा त्याच्या हातात पडल्याचे पाहून सर्वच यंत्रणेने सुटकेचा निश्वा:स सोडला.
त्याचे झाले असे...गुरुवारी दुपारी सिन्नर तालुक्यातल्या मलढोण येथील एका वयोवृध्द नागरिकाने वावीच्या महाराष्ट्र बॅँकेतून दोन लाख रुपये काढले. घरी गेल्यानंतर या वृध्दाला आपण बॅँकेतून पैसे काढले का नाही याचाच विसर पडला. काढले तर पैसे गेले कुठे या विचाराने त्याला रात्री झोप आली नाही. शुक्रवारी तो बॅँकेत आला मात्र संप असल्याने बॅँक बंद होती. शनिवारी बॅँक उघडल्यानंतर तो वृध्द पुन्हा वावीच्या महाराष्ट्र बॅँकेत आला.
बॅँकेच्या कर्मचाऱ्यांनी ‘बाबा’ तुम्ही गुरुवारी दुपारी दोन लाख रुपये काढून नेल्याचे सांगत पासबुकातील नोंद दाखवली. त्यानंतर या ज्येष्ठ नागरिकाने आपल्याला पैसे मिळालेच नाही असा पवित्रा घेतला. त्यामुळे रोखपालासह व्यवस्थापक काहीकाळ हादरले. त्यांनी विड्रॉल स्लीप तपासली. त्यावर या ज्येष्ठ नागरिकाचा अंगठा व दस्तूर दिसून आला. मात्र या बाबांनी पैसे मिळाल्याचे नसल्याची भूमिका घेतल्याने कर्मचारी दस्तूर व्यक्तीचा शोध घेऊ लागले. दस्तूर व्यक्ती वावी गावातील होती. मात्र त्याचे टोपण नाव दुसरे असल्याने ‘त्या’ नावाचा व्यक्ती सहजासहजी कोणाच्या लक्षात येत नव्हता. तोपर्यंत या वयोवृध्द नागरिकाने पोलीस ठाणे गाठले होते. प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्यानंतर बॅँक कर्मचाऱ्यांनाही घाम फुटला.
वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रणजीत आंधळे यांनी या वयोवृध्द नागरिकाकडून घटना जाणून घेतली. दोन लाख रुपये काढण्यासाठी तुम्ही गुरुवारी बॅँकेत आला होता मग मग दोन दिवसांनंतर पैसे लंपास झाल्याची तक्रार देण्यासाठी तुम्ही आले, एवढा उशीर का झाला असा प्रश्न विचारला. त्यानंतरही बॅँक पासबुकात दोन लाख रुपये काढल्याची नोंद असल्याने सहाय्यक निरीक्षक आंधळे यांनी तातडीने बॅँकेत पोलीस कर्मचारी पाठवून सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा निर्णय घेतला. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास वयोवृध्द नागरिक व त्याच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीने बॅँकेतून दोन लाख रुपये रोखपालाकडून घेतल्याचे स्पष्टपणे दिसत होते. मात्र त्यानंतर त्याच्या शेजारी उभा असलेला व्यक्ती दोन लाख रुपये घेऊन गेल्याचे फुटेजमध्ये दिसून आले. या वयोवृध्द नागरिकाने आपणच पैसे काढत असल्याचे त्याच्या मिणमिणत्या डोळ्याने ओळखून पैसे काढल्याचे मान्य केले. त्यामुळे बॅँक कर्मचाऱ्यांचा जीव भांड्यात पडला. मात्र शेजारी कोण व्यक्ती आहे ते ओळखले नाही. आपल्याला भुरळ पाडून सदर व्यक्तीने आपले पैसे लंपास केल्याचा आरोप या वृध्दाने करुन टाकला. बॅँक कर्मचारी पहिल्या आरोपातून सहीसलामत बाहेर पडले होते. मात्र दोन लाख रुपये घेवून जाणारी व्यक्ती कोण या विचारात पोलीस यंत्रणा पडली.
बॅँकेतून दोन लाख रुपये घेवून जाणाऱ्या व्यक्तीने डोक्यात हॅट व अंगात जर्कींग घातले असल्याने सीसीटीव्ही फुटेजमध्ये सदर व्यक्ती स्पष्टपणे दिसत नसल्याने अज्ञात व्यक्ती विरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करावा लागेल असे जवळपास निश्चीत झाले होते. मात्र सदर व्यक्तीने बॅँकेत एका ओळखीच्या व्यक्तीच्या पाठीवर थाप टाकून त्याच्यासोबत वार्तालाप केल्याचे फुटेजमध्ये दिसून आले.
सहाय्यक निरीक्षक आंधळे यांनी तातडीने सदर व्यक्तीला बॅँकेत घेवून येण्याच्या सूचना पोलीस कर्मचाऱ्यांना सोडल्या. सदर व्यक्ती निऱ्हाळे येथील असल्याने त्याला तातडीने बॅँकेत आणण्यात आले. निऱ्हाळे येथील त्या व्यक्तीने पैसे घेऊन जाणारी ती अनोळखी व्यक्ती ओळखली. त्याने सदर व्यक्ती वावी गावातीलच व्यावसायिक असल्याचे सांगितले. तातडीने पोलिसांनी त्या व्यक्तीला बॅँकेत बोलावून घेतले. आणि त्या ज्येष्ठ नागरिकापुढे उभे केले. त्यानंतर या वृध्दाला विस्मरणात (?) गेलेल्या गोष्टी आठवू लागल्या. आपणच या व्यक्तीला दोन लाख रुपये हात उसणे दिल्याचा खुलासा या ज्येष्ठ नागरिकाने केला. वृध्दाच्या या खुलाश्याने पोलीस व बॅँक कर्मचाऱ्यांसह उपस्थितीतांची ‘हसावे की रडावे’ अशी अवस्था झाली.

Web Title: When two lakhs of stolen were revealed ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.