घोटी येथील टोल बंद होताच रस्त्याला ग्रहण
By Admin | Updated: October 23, 2015 22:06 IST2015-10-23T22:03:55+5:302015-10-23T22:06:01+5:30
घोटी येथील टोल बंद होताच रस्त्याला ग्रहण

घोटी येथील टोल बंद होताच रस्त्याला ग्रहण
घोटी : घोटी-सिन्नर रस्त्याची ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वावर रस्ते विकास महामंडळाकडून निर्मिती झाल्यानंतर व टोल वसुली बंद झाल्यानंतर रस्त्याच्या दुरुस्तीकडे व देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने रस्त्याला घरघर लागली आहे. प्रचंड खड्डे, धूळ यामुळे रस्त्याची चाळण झाली असल्याने वाहनांचे नुकसान होत आहे.
घोटी-सिन्नर रस्त्यावर पथकर आकारणी करण्यात आली. टोलची मुदत संपुष्टात आल्यानंतर रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नाक्याला विरोध होऊ लागल्याने टोल वसुली थांबविण्यात आली. टोल बंद झाल्याबरोबर रस्त्याच्या दुरुस्तीकडे शासनाने पाठ फिरविल्याने या रस्त्याची वाताहत झाली.
रस्त्यावर घोटी शहरापासून सिन्नरपर्यंत जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्याची चाळण झाली असल्याने रस्त्यावर धुळीच्या प्रमाणात वाढ झाल्याने आजाराला निमंत्रण मिळत असल्याने वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे. (वार्ताहर)