...जेव्हा दंगलखोर भर चौकात उठबशा काढतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:14 IST2021-02-12T04:14:24+5:302021-02-12T04:14:24+5:30
जुन्या नाशकातील महालक्ष्मी चाळीत सोमवारी रात्री दोन टोळ्यांमध्ये वाद होऊन दंगलीचा भडका उडाला. यावेळी शस्त्रांचा सर्रासपणे दोन्ही गटांकडून वापर ...

...जेव्हा दंगलखोर भर चौकात उठबशा काढतात
जुन्या नाशकातील महालक्ष्मी चाळीत सोमवारी रात्री दोन टोळ्यांमध्ये वाद होऊन दंगलीचा भडका उडाला. यावेळी शस्त्रांचा सर्रासपणे दोन्ही गटांकडून वापर झाल्याने एका गटातील एक गंभीर जखमी तर एक जागीच ठार झाला तर दुसऱ्या गटातील एक गंभीर जखमी झाला. पोलिसांनी या गुन्ह्यात एकूण आठ संशयित दंगलखोरांना अटक केली आहे. यामध्ये काही सराईत गुंड असून एकावर तर तडीपारीची कारवाईदेखील पोलिसांकडून करण्यात आली आहे. यावरून या गुन्हेगारांचा पूर्व इतिहास सहज लक्षात येतो. ज्या जुन्या नाशकात या गुंडांनी टोळ्या पोसण्याचे काम करत कायदा-सुव्यवस्थेला वारंवार बाधा निर्माण केली त्याच भागात पोलिसांनी गुरुवारी (दि. ११) त्यांची भर दुपारी ‘वरात’ काढली.
काही गुंडांच्या हाताला दोरखंड तर काहींच्या हातात बेड्या ठोकून पोलिसांनी गजबजलेल्या जुने नाशिक भागातील वडाळा नाका, महालक्ष्मी चाळ, बागवानपुरा, चौक मंडई या परिसरातून त्यांची धिंड काढली असता रस्त्यांच्या दुतर्फा बघ्यांनी गर्दी केली होती. दरम्यान, एका ठिकाणी मोठ्या संख्येने टवाळखोरांचे टोळके जमा झाल्याने पोलिसांनी त्यांना हातातील काठ्यांनी ‘प्रसाद’ देत पिटाळून लावले.
---कोट---
शहर व परिसरात पोलीस आयुक्तांनी जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू केला आहे. आगामी धार्मिक, सामाजिक सण, उत्सव लक्षात घेता शहरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रयत्नशील असून कायदा हातात घेणाऱ्यांची कुठल्याही प्रकारे गय केली जाणार नाही. परिमंडळातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना त्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
- दीपाली खन्ना, सहायक पोलीस आयुक्त