कोरोना लसींचे कॉकटेल केले तर ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:12 IST2021-05-30T04:12:53+5:302021-05-30T04:12:53+5:30
नाशिक : कोरोनाविरोधात प्रतिकारशक्ती म्हणजेच शरीरामध्ये अँटिबॉडीज तयार होऊन लस परिणामकारक ठरण्यासाठी तिचे दोन डोस घ्यावे लागतील. तसेच लसीचा ...

कोरोना लसींचे कॉकटेल केले तर ?
नाशिक : कोरोनाविरोधात प्रतिकारशक्ती म्हणजेच शरीरामध्ये अँटिबॉडीज तयार होऊन लस परिणामकारक ठरण्यासाठी तिचे दोन डोस घ्यावे लागतील. तसेच लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर सहा ते आठ आठवड्यांनी दुसरा डोस घेणे अपेक्षित असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केले होते. मात्र, लसीचा पहिला डोस घेतलेल्या व्यक्तींना लसीच्या तुटवड्यामुळे दुसरा डोस वेळेत मिळाला नाही तर काय करायचे? अथवा पहिल्यांदा घेतलेल्याच लसीचा दुसरा डोस मिळाला नाही म्हणून दुसऱ्याच लसीचा डोस घेतला तर काय होणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.
कोरोना लसीचा दुसरा डोस मिळाला नाही तर कोरोना विषाणूंशी लढण्यासाठी आवश्यक अँटिबॉडी तयार होणार नाहीत का? पहिला डोस एका लसीचा घेतला आणि ती लस उपलब्ध नसेल, पण दुसरी उपलब्ध असेल, तर दुसरा डोस वेगळ्या लसीचा घ्यायचा का? असे प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झालेले आहेत. अनेक जिल्ह्यांत असा कॉकटेलचा प्रकार घडल्यानंतर लसीचा पहिला डोस वेगळा आणि दुसरा वेगळा घेतला तरी त्याचा विपरित परिणाम होत नाही, असे केंद्राने स्पष्ट केले आहे. मात्र, डॉक्टरांकडून अशा प्रकारे वेगवेगळ्या लसींचे दोन डोस घेणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. दोन वेगवेगळ्या लसी शरीरात वेगवेगळ्या पद्धतीने काम करून प्रतिकारशक्ती वाढवतात. त्यामुळे पहिल्यांदा घेतलेल्या लसीचाच दुसरा डोस घेणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया डॉक्टरांकडून व्यक्त होत आहे.
----
जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण
वयोगट पहिला डोस दुसरा डोस
ज्येष्ठ नागरिक - २५८७२० - ७८५०८
४५ ते ६० - ३१२०४८ - ६८३४६
१८ ते ४४ - १४३१३ - १२३
---
तज्ज्ञ डॉक्टर्स काय म्हणतात...
एकाच व्यक्तीला दोन लस देण्याचा प्रकार शक्यतो घडत नाही. डॉक्टर व नर्ससह लसीकरण मोहिमेतील कर्मचाऱ्यांचे संपूर्ण प्रशिक्षण झालेले असल्याने ते नियोजनानुसारच काम करतात. त्याचप्रमाणे दोन वेगवेगळ्या लसींचे पहिला डोस आणि दुसऱ्या डोसचे अंतरही वेगवेगळे आहे. हे त्या लसीच्या प्रतिपिंड तयार करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असल्याने निश्चित केलेल्या नियोजनानुसारच लस दिली जाते. प्रत्येक लस तयार करण्याचे स्वतंत्र तंत्रज्ञान आहे. त्यामुळे पहिला डोस घेतलेल्या लसीचाच दुसरा डोस घेणे उत्तम आहे. - डॉ. वसिष्ठ नामपल्ली, अधीक्षक, संदर्भ सेवा रुग्णालय, नाशिक
----
कोट-
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रात गत एक ते दीड महिन्याच्या कालावधीत असा कोणताही प्रकार घडल्याचे ऐकीवात नाही. मात्र, असा प्रकार घडल्यास संबंधित व्यक्तीने काळजी घेणे आवश्यक असून, लसीकरणानंतर जाणवणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य तो उपचार घेणे आवश्यक आहे.
- डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, नाशिक
---
कोट-३
कोरोना प्रतिबंधात्मक लसी वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्यामुळे एकाच रुग्णाला दोन वेगवेगळ्या लसींचे डोस दिले गेले तर त्याचा अपेक्षित फायदा होणार नाही. सद्यस्थितीत याचे दूरगामी परिणाम लक्षात आलेले नाही; मात्र काही रुग्णांना त्याचे विपरित परिणामही जाणवू शकतात. यासाठी आरोग्य सेवकांनी व नागरिकांनी स्वत:ही योग्य ती काळजी घेतली, दोन्ही घटकांनी त्यांची जबाबदारी योग्यरीतीने पार पाडली तर अशा घटना घडणारच नाही.
- डॉ. मंगेश थेटे, माजी अध्यक्ष, आयएमए, नाशिक