बँकांमधील गर्दीचे करायचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:24 IST2021-05-05T04:24:15+5:302021-05-05T04:24:15+5:30

नाशिक : शहरात संचारबंदी लागू असतानाही विविध बँकांच्या शाखांमध्ये मात्र ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. बँका व ...

What to do with the crowds in the banks? | बँकांमधील गर्दीचे करायचे काय?

बँकांमधील गर्दीचे करायचे काय?

नाशिक : शहरात संचारबंदी लागू असतानाही विविध बँकांच्या शाखांमध्ये मात्र ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. बँका व विविध वित्तीय संस्थांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांतून सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे बँकांचे व्यवहार सुरू असल्याने नागरिक बँकांमध्ये गर्दी करून पैसे काढण्यासाठी रांगा लावत आहेत. त्यामुळे बँकांमधील या गर्दीचे करायचे काय, असा प्रश्न विविध बँकांच्या व्यवस्थापनांसमोर निर्माण झाला आहे.

बँकांमध्ये गर्दी करणाऱ्या खातेधारकांमध्ये बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असून, ही ज्येष्ठ मंडळी पेन्शन काढण्यासाठी बँकांमध्ये गर्दी करीत आहेत. त्याचप्रमाणे अन्य नागरिकांकडून बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी होत आहे. सध्याच्या कोरोना परिस्थितीत अडचणीत असलेल्या नागरिकांसोबतच संकट काळात हाताशी पैसा असावा म्हणून अनेक जण पैसे काढून स्वत:जवळ ठेवत आहेत. त्यामुळे बँकांमध्ये गर्दी वाढत असून, त्याचा बँक व्यवस्थापनासह कर्मचारी व अधिकाऱ्यांवर ताण निर्माण होत आहे.

ग्राहकांची बँकांमध्ये गर्दी होत आहे, सध्या पेन्शनचा आठवडा असल्याने पेन्शनधारकांचीच संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ही सर्व ज्येष्ठ मंडळी असल्याने फिजिकल डिस्टन्स राखण्यासाठी सुरक्षारक्षक व कर्मचारी विशेष प्रयत्न करीत आहेत. परंतु अशा परिस्थितीत काम करणे बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी तारेवरची कसरत बनली आहे.

- मनोज जाधव, अधिकारी, नाशिक शहर शाखा, बँक ऑफ महाराष्ट्र

--

बँकेत पैसे काढण्यासाठी व भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे करांसंबंधी बँक खात्यांचा तपशील व अन्य प्रक्रिया करणाऱ्या ग्राहकांचीही बँकांमध्ये गर्दी आहे. त्यामुळे बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. सध्या बँकांची वेळ दुपारी २ वाजेपर्यंतच करण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वी सायंकाळपर्यंत येणारे ग्राहक आता दुपारी दोन वाजेपर्यंतच येत असल्याने कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताणही वाढला आहे. कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना होणे आवश्यक आहे.

- स्वाती लोखंडे, रोखपाल, ॲग्री हायटेक ब्रँच, गंगापूर शाखा

----

अधिकाऱ्यांची कसरत

बँकांमध्ये येणाऱ्या खातेधारकांची गर्दी कमी करण्यासाठी तसेच खातेधारकांमध्ये फिजिकल डिस्टन्सच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी बँकेतील अधिकाऱ्यांना सुरक्षारक्षकांच्या मदतीने कसरत करावी लागत आहे. रांगेत उभे रहाणारे बहुतांश ग्राहक वैद्यकीय कारणे सांगत असल्याने अशा ग्राहकांची मदत करण्यासाठी बँक कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर कामाचा ताण वाढतो आहे.

--

यंत्रणेतील उणिवांमुळे ताण

बँकांमधील पैसे काढणाऱ्या आणि भरणा करणाऱ्या ग्राहकांची गर्दी कमी करण्यासाठी बँकिंग प्रणालीत एटीएम आणि सीडीएमसारख्या यंत्रणेचा समावेश करण्यात आला आहे. परंतु सध्यस्थितीत शहरातील बहुतांश सीडीएम बंद आहेत. तर अनेक एटीएममध्ये रोखीचा अभाव अथवा तांत्रिक बिघाड झालेला आहे. यंत्रणेतील या उणिवांमुळे बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांवरील ताण वाढतो आहे.

-----

ग्राहकांच्या प्रतिक्रिया-

वाढत्या वयामुळे आजारपण वाढले असून औषधांचा खर्चही वाढला आहे. हा खर्च भागविण्यासाठी पेन्शनचाच आधार असून पेन्शन काढण्यासाठी बँकेत आल्याशिवाय पर्याय नाही.

- राजाराम जाधव, ग्राहक

--

सीडीएममध्ये भरणा करण्यासाठी तीन ते चार ठिकाणी प्रयत्न केले. परंतु, दोन ठिकाणी सीडीएम बंद होते तर एका ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे भरणा करू न शकल्याने थेट बँकेत येऊन खात्यावर पैसे टाकण्याचा मार्ग निवडावा लागला.

- विलास पवार, ग्राहक

---

एटीएममधून एकाचवेळी मोठी रक्कम काढता येत नाही. त्यामुळे बँकेत रांगेत उभे राहण्याशिवाय पर्याय नाही. तसेच एटीएममधून वारंवार पैसे काढताना बँकेकडून त्याचे अतिरिक्त सेवा शुल्क आकारले जाते. उलट बँकेत कितीही मोठी रक्कम एकाच वेळी सहज काढता येते आणि वारंवार व्यवहारही करावा लागत नाही.

- विजय कासार, ग्राहक

Web Title: What to do with the crowds in the banks?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.