कंधाणे येथे विहीर कोसळली
By Admin | Updated: November 23, 2014 23:03 IST2014-11-23T23:02:56+5:302014-11-23T23:03:11+5:30
कंधाणे येथे विहीर कोसळली

कंधाणे येथे विहीर कोसळली
कंधाणे : दोन वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून बांधकाम झालेली विहीर शनिवारी पहाटेच्या सुमारास अचानक पाठीमागील भरावा खचल्याने संपूर्ण जमीनदोस्त झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी नुकसानग्रस्त अल्प भूधारक शेतकऱ्याच्या कुटुंबाला मात्र उघड्यावर येण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
कंधाने येथील शेतकरी गंगाधर जिवबा बिरारी यांच्या मालकीचे ग.ट.नंबर १२८ क्षेत्र २ एकर या शेताला पाणीपुरवठा करण्यासाठी विहीर खोदाई केली होती. विहिरीचे बंधन कच्चे असल्याने विहिरीत सतत मातीचे ढिगारे कोसळत होते. सततच्या त्रासाला कंटाळून संबधित शेतकऱ्याने कर्ज काढून दोन वर्षांपूर्वी विहीरचे बांधकाम करून मागे मातीचा भरावा टाकून काम पूर्ण केले. लाखो रुपये कर्जाऊ घेऊन जिराईत जमीन ओलिताखाली आणली, पण चार दिवसांपूर्वी आलेल्या बेमोसमी पावसाचे पाणी विहिरीच्या मागे केलेल्या मातीच्या भरावामध्ये शिरल्याने विहिरीला ओलावा तयार झाला. लागवड केलेल्या पिकांना पाणी द्यावे कसे असा यक्ष प्रश्न या शेतकऱ्याला पडला आहे. शासनाने आपत्तीग्रस्त निधीतून या अल्पभूधारक शेतकऱ्याला मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत आहे.
संबंधितांना याबाबत दूरध्वनीवरून माहिती दिली असता अद्यापर्यंत नुकसानग्रस्त विहिरीचा पंचनामा करण्यासाठी कोणीही आले नसल्याने याबाबत परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)