आज होणार बाप्पांचे जल्लोषात स्वागत
By Admin | Updated: September 5, 2016 00:24 IST2016-09-05T00:24:12+5:302016-09-05T00:24:51+5:30
आज होणार बाप्पांचे जल्लोषात स्वागत

आज होणार बाप्पांचे जल्लोषात स्वागत
नाशिक : गणपती बाप्पा मोरया । मंगलमूर्ती मोरया ।। अशा जयघोषाने सोमवारी (दि. ५) शहरात घरोघरी पार्थिव गणपतीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. शनिवारी आणि रविवारी सुटी असल्याने शहरातील बाजारपेठेत गणेशोत्सवासाठी लागणारे विविध साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र बघायला मिळाले.
चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पांचे सोमवारी म्हणजेच भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरोघरी आगमन होत असून, सूर्र्याेदयापासून दुपारी १.३० वाजेपर्यंत पार्थिव गणपतीची प्रतिष्ठापना करता येणार आहे. रविवारी (दि. ४) संध्याकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी हिंदू पंचांगानुसार चतुर्थी या तिथीला प्रारंभ झाला असून, सोमवारी रात्री ९ वाजून ९ मिनिटांपर्यंत ही तिथी सुरू राहणार आहे. सोमवारी दुपारी १.३० वाजेपर्यंत गणपती प्रतिष्ठापना करण्यासाठी मुहूर्त असला, तरी ज्या भाविकांना दुपारी १.३० वाजेपर्यंत गणपतीची प्रतिष्ठापना करणे शक्य नाही त्यांनी ६ वाजून ४९ मिनिटे म्हणजेच सूर्यास्तापर्यंत पार्थिव गणपतीची प्रतिष्ठापना करावी, असे शास्त्र अभ्यासक रत्नाकर संत यांनी सांगितले.
गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले असून, भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळते आहे. प्रतिष्ठापना विधीसाठी आवश्यक असणारे साहित्य, आकर्षक मखर घेण्यासाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळाली. घरोघरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळांचे रविवारी रात्री उशिरापर्यंत देखावे उभारण्याचे काम सुरू होते. पूजेसाठी लागणारी वेगवेगळ्या प्रकारची पत्री, फुले, केवड्याची पानं, कमळाची फुलं, दूर्वा, तुळशी तसेच गणपतीला आवडणारी २१ प्रकारची भाजी खरेदी करण्यासाठीदेखील महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पूजा साहित्य खरेदी करण्याबरोबरच आरतीसंग्रह तसेच प्रतिष्ठापना विधीची पुस्तके आणि सीडीज् घ्यायलाही दुकानांमध्ये गर्दी होताना दिसत आहे.