लाभतेय सोळा राज्यांच्या कलाकुसरीला दाद
By Admin | Updated: July 31, 2016 00:35 IST2016-07-31T00:30:03+5:302016-07-31T00:35:51+5:30
हस्तकला : ज्यूटच्या वस्तू, करवंटीची आभूषणे लक्षवेधी

लाभतेय सोळा राज्यांच्या कलाकुसरीला दाद
नाशिक : राजस्थानी कलाकुसर केलेल्या कठपुतळ्या अन् शोभेच्या आकर्षक वस्तू, बिहारची मधुबनी चित्रकला, हैदराबादची अस्सल मोतीकला, देवदारच्या फांद्यांपासून बनविलेले अरुणाचल प्रदेशच्या शोभेच्या वस्तूंसह तब्बल सोळा राज्यांमधील स्थानिक नावीन्यपूर्ण वस्तूंचा खजिना नाशिककरांपुढे खुला झाला आहे.
निमित्त आहे आदिरंग महोत्सवाचे. महोत्सवांतर्गत तब्बल सोळा राज्यांच्या कलाकुसरीची नाशिककरांना यानिमित्ताने ओळख होत आहे. विविध राज्यांमधील आदिवासी लोककलेबरोबरच तेथील शृंगारिक वेशभूषा, कपडे, पादत्राणे, वाद्य आदि वस्तू नाशिककरांना यानिमित्ताने बघावयास मिळत आहे. नाशिककरांचा आदिरंग महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. आदिवासी पाड्यांवर असलेल्या झोपड्यांच्या आकारात सभागृहाच्या बाहेर सुमारे २५ स्टॉल्सची उभारणी करण्यात आली आहे. यामध्ये देशाच्या विविध राज्यांची हस्तकला प्रदर्शित करण्यात आली असून, आसाम, हरियाणा, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, दार्जिलिंग, बिहार, राजस्थान, हैदराबाद आदि राज्यांमधील पोशाख, शृंगार साहित्य, हस्तकलेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या विविध वस्तू, अलंकार, पादत्राणे, शोभेच्या वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
शहरात अशा प्रकारचे प्रदर्शन प्रथमच भरविण्यात आल्याने आबालवृद्धांची या ठिकाणी गर्दी लोटत आहे. दुपारनंतर प्रदर्शनाला नाशिककरांनी मोठ्या संख्येने भेट दिली. महोत्सवामध्ये हिमाचल प्रदेशची बराल टू, राजस्थानचे स्वांग नृत्यकला, मणिपूरचे पुंग चोलम, छत्तीसगडचे गौंड मारिया, गुजरातमधील राठवा, केरळची कावडी यांसह विविध राज्यांमधील नृत्यकलेच्या मेजवानीचा आस्वाद नागरिक घेत आहेत. सांस्कृतिक वारसा असलेल्या नाशिककरांना ‘आदिरंग’ने मोहिनी घातली आहे.