शस्त्रक्रियेविना वजन घटले :भारतात प्रथमच नाशिकला प्रयोग
By Admin | Updated: June 7, 2017 22:38 IST2017-06-07T22:38:18+5:302017-06-07T22:38:18+5:30
वजन घटविण्यासाठी केवळ बॅरीएट्रीक इन्बोलायजेशन उपचार पद्धतीने जठरातील हार्माेन कमी करून सहा महिन्यांत २५ टक्के वजन घटविण्याचा प्रयोग

शस्त्रक्रियेविना वजन घटले :भारतात प्रथमच नाशिकला प्रयोग
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : वजन कमी करण्यासाठी जोखमीच्या शस्त्रक्रिया करून जिवावर बेतण्याचे अनेक प्रकार उघड झालेले असताना, वजन घटविण्यासाठी केवळ बॅरीएट्रीक इन्बोलायजेशन उपचार पद्धतीने जठरातील हार्माेन कमी करून सहा महिन्यांत २५ टक्के वजन घटविण्याचा प्रयोग भारतात प्रथमच नाशिकला राबविला जात असल्याचा दावा येथील डॉ. सुजित कदम यांनी केला आहे.
डॉ. सुजित कदम यांच्या रुग्णालयात उमराणे (ता. देवळा) येथील तब्बल १४० किलो वजन असलेल्या कैलास गायधनी या ४५ वर्षीय रुग्णावर हा प्रयोग बुधवारी (दि.७) करण्यात आला असून, त्यांना लगेचच गुरुवारी (दि.८) रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार असल्याचे डॉ. सुजित कदम यांनी सांगितले. वजन कमी करण्यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत अत्यंत किचकट आणि जोखमीच्या शस्त्रक्रिया रुग्णांवर करण्यात येतात. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्चही येतो. शिवाय शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णाला सरासरी १५ ते २० दिवस रुग्णालयातच उपचार घ्यावे लागतात. मात्र बॅरीएट्रीक इन्बोलायजेशन या अत्यंत जुजबी व सोप्या पद्धतीने लठ्ठ व्यक्तीचे सहा महिन्यात एकूण २५ टक्के वजन कमी करता येते. जर्मनी, अमेरिकेत ही पद्धत अवलंबिली जाते. उमराणे येथील कैलास गायधनी यांचे १४० किलो वजन घटविण्यासाठी कोणतीही जोखीम न स्वीकारता या पद्धतीने उपचार करण्याचा सल्ला माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत देवरे व आमदार डॉ. राहुल अहेर यांनी कैलास गायधनी यांना दिला. त्यांना कॉलेजरोडवरील व्हीजन रुग्णालयात मंगळवारी (दि.६) सायंकाळी दाखल करण्यात आले. बुधवारी त्यांच्यावर डॉ. सुजित कदम व डॉ. अमोल भालेराव यांनी बॅरीएट्रीक इन्बोलायजेशन पद्धतीने अॅन्जीओग्राफी करून त्यांच्या जठरातील ग्रेलीन हार्माेन कमी करण्यात आले. या ग्रेलीन हार्मोनमुळेच जास्त भूक लागून मनुष्य जास्त जेवण करतो परिणामी त्याचे वजन वाढते. या उपचार पद्धतीनंतर भूक कमी लागून सहा महिन्यांत एकूण २५ टक्के वजन कमी होत असल्याचे डॉ. सुजित कदम यांनी सांगितले.९