गोदाकाठचा आठवडे बाजार विस्कळीत
By Admin | Updated: August 11, 2016 00:22 IST2016-08-10T23:53:10+5:302016-08-11T00:22:56+5:30
पूर ओसरला : म्हसोबा महाराज पटांगणावर अजूनही पाणी कायम

गोदाकाठचा आठवडे बाजार विस्कळीत
पंचवटी : गोदावरीला आलेल्या पुराचे पाणी ओसरले असले तरी नाल्याचे पाणी म्हसोबा महाराज पटांगणावर वाहत असल्याने बुधवारी भरणारा आठवडे बाजार काहीसा विस्कळीत झाला. रस्त्यावर पाणी असल्याने घाट आणि पटांगणातील कोरड्या जागेवरच विक्रेत्यांना दुकाने मांडावी लागली.
रस्त्यावर पाणी असल्याने व्यावसायिकांना बसण्यासाठी जागा नाही. मोजक्याच विक्रेत्यांनी गंगाघाट व म्हसोबा महाराज पटांगणावर कोरडी जागा बघून दुकाने मांडली. गोदावरीला गेल्या मंगळवारी आलेल्या पुरानंतर दुसऱ्या दिवशी पुराचे पाणी कायम असल्याने मागील बुधवारीही आठवडे बाजार ठप्पच होता. त्यातच आज पुन्हा म्हसोबा महाराज पटांगणावर नाल्याचे व नदीपात्रातील पाणी असल्याने आठवडे बाजारातील दुकानदारांना मोठे नुकसान सहन करावे लागत असून सलग दुसऱ्यांदा आठवडे बाजार विस्कळीत झाल्याने बुधवार बाजारातील लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली.
बुधवारच्या आठवडे बाजारात पाणी असल्याने अनेक व्यावसायिकांना दुकाने मांडण्यास जागा मिळाली नाही. त्यांनी दाटीवाटीने दुकाने मांडण्यासाठी जागा केली असली तरी सर्व व्यावसायिकांना पुरेशी जागा उपलब्ध झाली नाही. त्यामुळे अनेक व्यावसायिकांनी जागा मिळेल तिथे दुकाने लावल्याचे चित्र बुधवारच्या बाजारात दिसून आले. (वार्ताहर)