संकेतस्थळ जाम
By Admin | Updated: June 9, 2015 02:17 IST2015-06-09T02:17:06+5:302015-06-09T02:17:28+5:30
संकेतस्थळ जाम

संकेतस्थळ जाम
नाशिक : दहावीचा निकाल अधिकृतपणे दुपारी एक वाजता संकेतस्थळावर जाहीर होणार असला तरी निकालाच्या एक तास आधीच अनेकांच्या व्हॉट्सअॅपवर नाशिक विभागाच्या निकालाची टक्केवारी फिरत असल्यामुळे सायबर कॅफेवर एकच गर्दी झाली. त्यामुळे दुपारी एक वाजता संकेतस्थळ जाम झाले होते. दुपारी साडेबारापासूनच विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांनी संकेतस्थळ सुरू केल्यामुळे दुपारी निकाल जाहीर झाल्यानंतर मात्र सुमारे अर्धा तास कुणालाही निकाल पाहणे शक्य झाले नव्हते. एकीकडे असे चित्र असताना बाहेरगावाहून अनेकांनी नाशिकमधील नातेवाइकांना भ्रमणध्वनी करून निकाल लागण्याची वार्ता पोहचविली. अनेकांनी तर भ्रमणध्वनीवरील संकेतस्थळावरच निकाल पाहिल्याचे सांगितले. मात्र संकेतस्थळावरून निकालाची प्रिंट निघेपर्यंत बराच वेळ लागत होता. थ्रीजी सुविधा असलेल्या भ्रमणध्वनीवर मात्र त्या तुलनेत लवकर निकाल बघता येत होता, असा दावा अनेक विद्यार्थ्यांनी केला. एकाचवेळी अनेक जण संकेतस्थळावर पोहोचण्याचा प्रयत्न करीत असल्याने संकेतस्थळ ठप्प झाल्याचे सांगितले जात होते.
दरम्यान, यंदा अनेक शाळांमध्ये निकालानंतर विद्यार्थ्यांची गर्दी झाल्याचे दिसून आले. शाळांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. (प्रतिनिधी)