पर्वणी सरली... घोषणा विरली...
By Admin | Updated: October 27, 2015 22:43 IST2015-10-27T22:42:17+5:302015-10-27T22:43:34+5:30
नियोजनाचा अभाव : आखाड्यांच्या जागांना ना कुंपण.. ना संरक्षण..., आश्वासनाचाही विसर

पर्वणी सरली... घोषणा विरली...
नाशिक : दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या तीनही प्रमुख आखाड्यांना तपोवनात कायमस्वरूपी जागा देऊन त्या जागांचे बारा वर्षे जतन व संरक्षण करण्याची प्रशासनाची घोषणा कुंभमेळ्याची तिसरी पर्वणी आटोपताच हवेत विरली आहे. दिगंबर, निर्र्माेही आणि निर्वाणी या तिन्ही आखाड्यांच्या इष्टदेवतांच्या पादुका असलेल्या ठिकाणी फक्त नावापुरतेच चबुतरे उभे राहिले असून, सध्या या आखाड्यांच्या मोजक्याच साधूंकडून या पादुकांची पूजा-अर्चा व संरक्षण केले जात असले तरी, या जागांना ना तारेचे कुंपण, ना संरक्षणाच्या दृष्टीने काही ठोस उपाययोजना प्रशासन करू शकले आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू-महंतांचे आखाडे व खालशांच्या जागेचा प्रश्न दर बारा वर्षांनी प्रशासनाला भेडसावित असून, त्यासाठी तपोवनात कायमस्वरूपी जागा संपादित करण्याची गरज वेळोवेळी बोलून दाखविण्यात आलेली आहे; परंतु योग्य मोबदल्याशिवाय जागा देण्यास तपोवनातील शेतकऱ्यांचा विरोध असल्यामुळे दर बारा वर्षांनी तात्पुरत्या स्वरूपात जागा भाड्याने अधिग्रहीत करून प्रशासनाला वेळ मारून न्यावी लागते. यंदाच्या कुंभमेळ्यातही साधू-महंतांच्या मागणीच्या तुलनेत म्हणजे पाचशे एकरपैकी सव्वातीनशे एकर जागा प्रशासनाला अधिग्रहीत करावी लागली, त्यात महापालिकेच्या मालकीची ५४ एकर जागेचा समावेश आहे. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या आखाड्यांना मोठ्या प्रमाणावर मुबलक व मोक्याच्या जागा लागतात, नव्हे त्यांचा आग्रहच तसा असल्यामुळे त्यांना जागावाटप करणे हीदेखील मोठी डोकेदुखी आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून यंदाच्या कुंभमेळ्यात प्रमुख तीन आखाड्यांना ज्या जागा प्रशासनाकडून बहाल करण्यात आल्या होत्या, त्या जागांवरच या आखाड्यांची धर्मध्वजा फडकली होती व इष्टदेवतांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्याच जागा पुढच्या बारा वर्षांनी त्याच आखाड्याला दिल्या जाव्यात यासाठी आखाड्यांच्या इष्टदेवतांच्या प्रतिष्ठापनेसाठी प्रशासनाने उभारलेले सीमेंटचे चबुतरे बारा वर्षे तसेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाने तसे लेखी पत्रही आखाड्याच्या प्रमुख महंतांना देऊन आखाड्यांनी चबुतऱ्यांवर इष्टदेवतांच्या पादुकांची प्रतिष्ठापना केलेली असल्याने या ठिकाणांचे संरक्षण करण्यासाठी त्याला बंदिस्त सभामंडप व तारेचे कुंपण उभारून देण्याचे आश्वासनही देण्यात आले. प्रशासनाच्या आश्वासनावर विश्वास ठेवून असलेल्या आखाड्यांनी तिसरी पर्वणी आटोपल्यानंतर आपल्या मूळ स्थानावर परतले व त्याला महिन्याचा कालावधी उलटला; परंतु आखाड्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचा त्यांना विसर पडला आहे.
सध्या दिगंबर आखाड्याच्या चरणपादुकांची देखभाल व संरक्षण दिगंबर आखाड्याचे स्थानिक साधू-महंत करीत आहेत, तर निर्माेही व निर्वाणी या दोन्ही आखाड्यांच्या चरणपादुकांच्या संरक्षणासाठी काही साधूंनीच पुढाकार घेतला आहे. चबुतऱ्यावरील चरणपादुकांचे पावित्र्य जपले जावे यासाठी या साधूंनी चबुतऱ्याजवळ तंबू ठोकला आहे, तर चबुतऱ्याच्या तिन्ही बाजूंनी पत्र्याचे शेड उभे करून पादुकांचे संरक्षण केले जात आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष : संरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचानाशिकच्या कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या तिन्ही प्रमुख आखाड्यांना प्रशासनाने कायमस्वरूपी जागा देण्याची तयारी दर्शवून त्यांच्या इष्टदेवतांच्या चरणपादुकांचे बारा वर्षे संरक्षण करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रत्यक्षात सिंहस्थ कुंभमेळ्याचा कालावधी सोडला, तर तपोवनात येणाऱ्या भाविक व पर्यटकांच्या दृष्टीने गोदावरी-कपिला संगम व रामकुटी या दोन गोष्टींनाच अधिक धार्मिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे ज्या जागा आखाड्यांसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत त्यांच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष होऊन धार्मिक पावित्र्य भंग होण्याची शक्यता साधू-महंतांनी व्यक्त केली आहे. तपोवनात असाही फिरस्ते, भिकाऱ्यांचा वावर असतो, त्यामुळे त्यांच्याकडूनच या जागा ताब्यात घेतल्या जाण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.