We will establish a government of justice in the state | राज्यात न्यायाचे सरकार स्थापन करू- आदित्य ठाकरे
राज्यात न्यायाचे सरकार स्थापन करू- आदित्य ठाकरे

ठळक मुद्देआदित्य ठाकरे : जनआशीर्वाद यात्रेचे आगमनतुम्ही सर्व आशीर्वाद देण्यास तयार आहात काय? असा सवालही त्यांनी केला

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पाच वर्षे सत्तेत असताना शिवसेनेने अनेक प्रश्नांवर लढा दिला, आंदोलने केली त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत युतीला यश मिळू शकले, असा दावा करून शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपली जनआशीर्वाद यात्रा स्वत:ला महाराष्टÑाचा मुख्यमंत्री म्हणून पुरस्कार करण्यासाठी नव्हे तर ज्यांनी लोकसभा निवडणुकीच्या यशात हातभार लावला त्यांचे आभार मानण्यासाठी काढली असून, महाराष्टÑात सुजलाम् सुफलाम् व न्याय देणारे सरकार स्थापन करण्यासाठी सर्वांची साथ मागण्यासाठी आपण आलो असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.


शिवसेनेच्या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात आयोजित विजयी संकल्प सभेत आदित्य ठाकरे बोलत होते. ठाकरे यांनी नेहमीच्या राजकीय सभेप्रमाणे व्यासपीठावरून मार्गदर्शन न करता थेट उपस्थितांमध्ये खुर्चीवर उभे राहून संवाद साधला. ते म्हणाले, नाशिकच्या पवित्र भूमीत १९९४ मध्ये शिवसेनेचे महाअधिवेशन झाल्यानंतर राज्यात १९९५ मध्ये युतीची सत्ता स्थापन होऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री सत्तेवर विराजमान झाले होते. त्यामुळे नाशिकच्या या भूमीतूनच आपण जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो असून, तुम्ही सर्व आशीर्वाद देण्यास तयार आहात काय? असा सवालही त्यांनी केला. नव महाराष्टÑ घडविण्यासाठी आपण ही यात्रा काढली असून, त्यात किती किलोमीटरचा प्रवास व किती दिवस लागतील हे मोजण्यापेक्षा या यात्रेच्या निमित्ताने आपल्याला किती आशीर्वाद मिळतात, हे पाहण्यासाठी आपण गावोगावी जात आहोत. गेल्या पाच वर्षे केंद्रात व राज्यात सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेने जनसामान्यांच्या प्रश्नांवर अनेक आंदोलन केली, आवाज उठविले अशा आंदोलनकर्त्यांचे आभार मानायला आपण यात्रा काढली असून, त्यामुळे लोकसभेत युतीला यश मिळू शकले, असा दावाही ठाकरे यांनी केला.
महाराष्टÑावर भगवा फडकविण्यासाठी, तसेच महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् करण्याबरोबरच, तुमच्या-आमच्या न्यायाचे सरकार स्थापन करण्यासाठी आपली जनआशीर्वाद यात्रा असून, स्वत:ला मुख्यमंत्री होण्यासाठी नव्हे असे स्पष्टीकरण देऊन आदित्य ठाकरे यांनी उपस्थिताना हात उंचावून साथ देण्याचे आवाहन करताच, सर्वांनी हात उंचावून प्रतिसाद दिला.


Web Title: We will establish a government of justice in the state
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.