भंगार बाजार ‘आम्ही’च हटविला!

By Admin | Updated: January 21, 2017 22:44 IST2017-01-21T22:44:18+5:302017-01-21T22:44:38+5:30

सेना-मनसेचा दावा : श्रेय घेण्यासाठी चढाओढ सुरू

We have deleted the scrap market! | भंगार बाजार ‘आम्ही’च हटविला!

भंगार बाजार ‘आम्ही’च हटविला!

नाशिक : शहराच्या कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारा अंबड-लिंकरोडवरील भंगार बाजार भुईसपाट करण्याची कामगिरी महापालिका प्रशासनाने यशस्वीरीत्या पार पाडल्यानंतर आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भंगार बाजारावरील कारवाईचेही श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. भंगार बाजार हटविण्याचे संपूर्ण श्रेय हे आमचेच असल्याचा दावा शिवसेना करत असताना मनसेनेही आमच्या सत्ताकाळातच ही कारवाई होऊ शकल्याचे म्हटले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत प्रचारात भंगार बाजाराचाही मुद्दा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चुंचाळे शिवार आणि अंबड-लिंकरोडवर गेल्या २० वर्षांपासून अनधिकृतपणे वसलेला भंगार बाजार हटविण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून आंदोलने केली जात होती. १९९५ च्या सुमारास भंगार बाजार विरोधी कृती समितीही स्थापन होऊन चळवळ अधिक तीव्र करण्यात आली होती. मात्र, सदर प्रकरण हे न्यायप्रवीष्ट झाल्याने महापालिकेकडून भंगार बाजार हटविण्याची कारवाई होत नव्हती. दरम्यान, शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप दातीर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करत भंगार बाजारविरोधात लढा पुकारला. त्यात यश येत न्यायालयाने भंगार बाजार उठविण्याचे निर्देश महापालिकेला दिले. मात्र, महापालिका प्रशासकीय पातळीवर भंगार बाजार हटविण्याबाबत विलंब लावला गेल्याने आयुक्तांविरोधी अवमानना याचिका दाखल झाली. दरम्यान, आठ महिन्यांपूर्वी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणाऱ्या अभिषेक कृष्ण यांनी न्यायालयाच्या निर्देशानुसार भंगार बाजार भुईसपाट करण्याचा निर्धार केला आणि ७ ते ९ जानेवारी या तीन दिवसांच्या कालावधीतच भंगार बाजारावरील कारवाई पूर्ण केली. या कारवाईचे नाशिककरांनी स्वागत केले.  आता भंगार बाजारावरील कारवाईचे श्रेय घेण्यासाठी प्रामुख्याने, शिवसेना व मनसे यांच्यात चढाओढ सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना भंगार बाजार हटविण्याची कार्यवाही मनसेच्या सत्ताकाळातच झाल्याचे सांगितले, तर स्थानिक पदाधिकाऱ्यांकडूनही भंगार बाजार हटविण्याची कारवाई मनसेनेच केल्याचे म्हटले आहे. शिवसेनेने तर आधीपासूनच भंगार बाजार हटविण्याचे श्रेय स्वत:कडे घेतले आहे. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत भंगार बाजार हासुद्धा प्रचाराचा मुद्दा ठरणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: We have deleted the scrap market!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.