वरण-भात, आम्ही नाही खात...!
By Admin | Updated: December 3, 2015 23:29 IST2015-12-03T23:29:04+5:302015-12-03T23:29:37+5:30
सामान्यांची फरपट : तूरडाळीपाठोपाठ तांदूळही महागण्याची चिन्हे; अपुऱ्या पावसाचा परिणाम

वरण-भात, आम्ही नाही खात...!
नाशिक : तूरडाळीचे भाव गगनाला पोहोचल्यानंतर आता तांदूळही महागण्याची चिन्हे असून, त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांची फरपट होऊन त्यांच्यावर ‘वरण-भात, आम्ही नाही खात’ असे म्हणण्याची वेळ येणार आहे. काही दिवसांपासून तांदळाचे दर वाढत असून, यंदा पावसाअभावी उत्पादनात घट झाल्याने पुढच्या वर्षी तांदूळ आणखी भडकण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
नाशिकमध्ये पंजाब, हरियाणातून बासमती, तर चंद्रपूर, मध्य प्रदेशसह इतर भागांतून अन्य प्रकारचा तांदूळ दाखल होतो. साधारणत: नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये नवा तांदूळ येतो. यंदा मात्र पाऊस कमी झाल्याने तांदळाच्या एकूण उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे शहरात नवा तांदूळ अत्यंत कमी प्रमाणात येत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. येत्या काळातही नेहमीच्या तुलनेत अवघ्या ६० टक्केच तांदळाची आवक होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे तांदळाच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. सध्या सर्वच प्रकारच्या तांदळाचे दर क्विंटलमागे शंभर रुपयांनी वाढले आहेत. साधा तांदूळ ३० ते ४० रुपये, तर बासमती तांदूळ १०० ते १५० रुपये प्रतिकिलो असे दर किरकोळ बाजारात असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तर तूरडाळीचे दरही १८० ते २०० रुपये प्रतिकिलो असे कायम असल्याचे सांगण्यात आले.