...हम फूल नही चिनगारी हैं !
By Admin | Updated: September 24, 2016 23:52 IST2016-09-24T23:52:10+5:302016-09-24T23:52:45+5:30
मराठाकन्यांनी मांडली समाजमनाची वेदना

...हम फूल नही चिनगारी हैं !
नाशिक : कोपर्डीची घटना आता शेवटचीच. आता आम्ही एकट्या नाहीत, आमच्या पाठीमागे संपूर्ण समाज एकवटला आहे. प्रतिसृष्टी बनविण्याचे मस्तक आणि मनगट मराठ्यांमध्ये आहे, असे सांगत ‘हम महाराष्ट्रकी नारी है, फूल नहीं चिनगारी हैं’, असा इशारा मराठाकन्यांनी देत समाजमनाची वेदना मांडली.
नाशिक जिल्हा समस्त मराठा समाजाच्या वतीने काढण्यात आलेला मराठा क्रांती मूक मोर्चा गोल्फ क्लब मैदानावर येऊन धडकला त्यावेळी लाखोने जमलेल्या जनसमुदायासमोर मुख्य विचारपीठावरून मराठाकन्यांनी समाजाच्या मनात साचलेल्या अस्वस्थतेला वाट मोकळी करून दिली. मोर्चाच्या सांगताप्रसंगी कोणत्याही राजकीय नेत्याच्या भाषणांऐवजी अकरा मुलींची निवड करण्यात येऊन त्यांना त्यांची मनोगते मांडण्याची संधी देण्यात आली. यावेळी सई वाघचौरे हिने सांगितले, कोपर्डी घटनेप्रकरणी न्याय हवा आहे. निर्भया कायद्यान्वये या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होण्याची गरज आहे. यापुढे महाराष्ट्रात आणखी किती बळी जाणार, असा सवालही तिने केला. चेतना अहेर हिने आता आम्ही एकट्या नाहीत, तर आमच्या पाठीशी समाज उभा आहे, असे सांगत हा आत्मक्लेश मोर्चा आहे. गुन्हेगारीचे प्रवृत्तीकरण न करता ती ठेचून काढण्याची काळाची गरज असल्याचे सांगितले. स्नेहा तांबे हिने महाराष्ट्र म्हणजे जिजाऊचा संस्कार असल्याचे म्हणत जिजाऊंच्या महाराष्ट्रात होणारे अन्याय कधी थांबणार, असा सवाल उपस्थित केला. मयुरी पिंगळे हिने सांगितले, स्त्रीला तिचा हक्क आणि सन्मान मिळायलाच हवा. तिच्या तत्त्वाचा आणि चारित्र्याचा अपमान सहन केला जाणार नाही. यापुढे महिलेवरील अत्याचार खपवून घेतला जाणार नसल्याचेही तिने स्पष्ट केले. ऋचा पाटील हिने आज समतेचे तुफान आले असल्याचे म्हणत नि:शब्द झालेल्या कळ्यांना आता रडायचे नाही, तर लढायचे असल्याचे सांगितले. पल्लवी फडोळ हिने महाराष्ट्रात शेतकरी भरडला जात असल्याचे सांगत शेतकऱ्यांच्याही प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची वेळ आली आहे. रसिका शिंदे हिने सांगितले, कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. आजवर ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या त्यात ८० टक्के मराठा समाजाचे आहेत. बळीराजालाही आरक्षण मिळाले पाहिजे. शिवस्मारक एक वर्षाच्या आत उभे राहिले पाहिजे, अशा मागण्याही तिने मांडल्या. अंकिता अहिरे हिने शोषितांच्या नावाखाली दहशत निर्माण केली जात असल्याचे सांगून अॅट्रॉसिटी कायदा कोणत्याही परिस्थितीत रद्द झालाच पाहिजे, असे ठणकावून सांगितले. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनावर रूचा पाटील, मयुरी पिंगळे, दिव्या महाले, रसिका शिंदे, सई वाघचौरे, चेतना अहेर, दिव्या साळुंके, गायत्री मगर, ऋतुजा दिघे, श्वेता भामरे, पल्लवी फडोळ, रुचिका ढिकले, ऋतुजा लोणे, काजल गुंजाळ, तृप्ती कासार यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. (प्रतिनिधी)
जनाच्या भाषणाने गहिवरला जनसागर
गोल्फ क्लबवर विचारपीठावरून बोलताना जना कृष्णा चौधरी या मुलीने केलेल्या भाषणाने अवघा जनसागर गहिवरला. जनाच्या आई-वडिलांनी आत्महत्त्या केली असून, ती आधाराश्रमात वास्तव्यास आहे. जनाने बोलताना सांगितले, कुणीही आत्महत्त्या करू नये. शेतकरी हालाखीचे जीवन जगतो आहे. त्याचे कर्ज माफ करून त्याच्या जगण्याची उमेद वाढविली पाहिजे, असेही तिने सांगितले. यावेळी आधारतीर्थ आश्रमातील आकांक्षा पवार हिने गीतातून शेतकऱ्यांच्या वेदना मांडल्या.