वावीच्या दुसऱ्या महिलेला संधी
By Admin | Updated: September 16, 2014 00:22 IST2014-09-15T21:14:10+5:302014-09-16T00:22:23+5:30
वावीच्या दुसऱ्या महिलेला संधी

वावीच्या दुसऱ्या महिलेला संधी
वावी : वावीच्या रहिवासी व पांगरी गणाच्या सदस्य संगीता विजय काटे या महिलेला पंचायत समितीच्या सभापतिपदी विराजमान होण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वी गावातील सुवर्णा दशरथ अहेर यांना सुमारे वर्षभरासाठी पंचायत समितीचा कारभार करण्याची संधी मिळाली होती. सौ. अहेर यांच्यानंतर संगीता काटे या वावीच्या महिलेला पंचायत समितीच्या सभापतिपदी विराजमान होण्याचे भाग्य लाभले आहे.
विकासकामांसाठी ग्रामीण भागाचा राबता असणाऱ्या व तालुकापातळीवर मिनीमंत्रालय म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पंचायत समितीचा कारभार हाती घेण्यासाठी मोठी स्पर्धा असते. त्यामुळे पंचायत समितीच्या सभापतिपदी विराजमान होण्याचे संधी महिलांना केवळ आरक्षणामुळे मिळते. या आरक्षणाच्या संधीतूनच वावीच्या दोन महिलांना पंचायत समितीचे सभापतिपद भूषविण्याची संधी मिळाली आहे.
गेल्या चार वर्षांपूर्वी पंचायत समितीच्या सभापती व पांगरी गणाच्या सदस्य गुणिता निकम यांचे निधन झाल्याने या जागेवर निवडणूक घेण्यात आली होती. त्यावेळी अनुसूचित जातीच्या महिलेसाठी सभापतिपदी राखीव होते. सभापतिपद अनुसूचित जागेसाठी राखीव असल्याने पांगरी गणात झालेल्या पोटनिवडणूक विजयी झालेल्या वावीच्या सुवर्णा अहेर वर्षभरासाठी थेट सभापतिपदी विराजमान झाल्या होता.
त्यानंतर सुमारे तीन वर्षांच्या काळानंतर येथील माजी सरपंच व विकास संस्थेचे अध्यक्ष विजय काटे यांच्या पत्नी सौ. संगीता काटे यांना सभापतिपद मिळाले आहे. आगामी अडीच वर्षांच्या काळासाठी सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. सभापतिपद खुल्या प्रवर्गासाठी असल्याने कॉँग्रेसमध्ये मोठी स्पर्धा होती. अशा परिस्थितीही सौ. संगीता काटे यांची सभापतिपदी वर्णी लागली. काटे यांच्या निवडीमुळे वावीकरांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची जोरदार आतषबाजी करीत सौ. काटे यांच्या निवडीचे वावीकरांनी स्वागत केले. (वार्ताहर)