येवल्याचे पाणी पेटणार

By Admin | Updated: December 4, 2015 22:39 IST2015-12-04T22:38:59+5:302015-12-04T22:39:45+5:30

पाटबंधारे विभागाचे पत्र : सिंचनासाठी आवर्तन अशक्य

The water will flow | येवल्याचे पाणी पेटणार

येवल्याचे पाणी पेटणार

येवला : रब्बी हंगामातील उन्हाळ कांद्याला जीवदान मिळण्यासाठी पालखेड धरण समूहातून किमान कालव्यालगतच्या चार किमी परिसरातील साठवण बंधारे भरून द्यावे या मागणीसाठी तालुक्यातील पाणीवापर संस्था, तसेच शिवसेना व राष्ट्रवादीसह सर्व राजकीय पक्ष, शेतकरी संघटना व जलहक्क संघर्ष समिती गेल्या दोन महिन्यांपासून पाठपुरावा करीत आहे. मात्र जलहक्क संघर्ष समितीला कार्यकारी अभियंता, पालखेड (पाटबंधारे विभाग) यांनी सिंचनासाठी पाणी देणे अशक्य असल्याचे लेखी पत्राद्वारे कळविले आहे. पाटबंधारे विभागाच्या नकारार्थी पत्राच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शनिवारी पाण्यासाठी आंदोलन करून सरकारला घरचा अहेर देणार असल्याने येवल्याचे पाणी पेटणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पालखेड आवर्तनाला लाल झेंडा दाखवल्यानेच पालखेड प्रशासनाने असे नकारार्थी पत्र दिल्याची चर्चा परिसरातील शेतकरीवर्गात सुरू आहे.
पालखेड धरण समूहात यंदा ५७ टक्के साठा आहे. सर्व पाणीसाठा बिगर सिंचनासाठी आधीच आरक्षित करण्यात आला आहे. या धरण समूहातील पालखेड, वाघाड व करंजवण या धरणांतील पाणी सरकारमान्य पिण्याचे पाणी योजनांसाठीच देण्याचे निश्चित आहे. त्यामध्ये येवला नगरपालिका, येवला ३८ गाव पाणीपुरवठा योजना, मनमाड नगरपालिका, मनमाड रेल्वे, एचएएल ओझर, जानोरी, पिंपळगाव, विंचूर, लासलगाव, येवला प्रासंगिक, पालखेड ५ गाव योजनाआदि योजनांचा समावेश आहे. पिण्याच्या पाण्यासाठी संपूर्ण २३७८ दलघफू पाणी आरक्षित असून, पालखेड धरणामध्ये बाष्पीभवन, नदीमार्गव्यय वजा जाता निव्वळ उपयुक्त साठा २४७२ दलघफू आहे. कालव्यावरील बिगर सिंचन योजनांसाठी दोन वेळेस व कालव्यालगतच्या ९६ किमीपर्यंतच्या गावांसाठी प्रासंगिक एक वेळेस पाणी देण्याचे नियोजन असून, सिंचनासाठी पाणी देणे केवळ अशक्य असल्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंपी यांनी जलहक्क संघर्ष समितीचे भागवत सोनवणे यांना कळविले आहे. (वार्ताहर)

Web Title: The water will flow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.