पाणीच पाणीच चोहीकडे, गेला रस्ता कुणीकडे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:18 IST2021-09-04T04:18:03+5:302021-09-04T04:18:03+5:30
नांदगाव : ‘पाणीच पाणी चोहीकडे गं बाई गेला रस्ता कुणीकडे’ अशी अवस्था एका रस्त्याची झाली आहे. कारण या रस्त्याला ...

पाणीच पाणीच चोहीकडे, गेला रस्ता कुणीकडे...
नांदगाव : ‘पाणीच पाणी चोहीकडे गं बाई गेला रस्ता कुणीकडे’ अशी अवस्था एका रस्त्याची झाली आहे. कारण या रस्त्याला पूर आला आहे. नदीला पूर येतो हे सर्वांना माहिती आहे; परंतु एखाद्या रस्त्याला पूर येतो हे अघटित वाटले तरी ते अगदी खरे आहे. नांदगाव ते जगधने वाडा या रस्त्यावर दोन वर्षांपासून पूर येतो, गेल्या वर्षी तीन ते चार महिने नदीपात्रातून वाहते तसे पाणी वाहिले. यंदा नद्यांना पूर येण्याआधीच या रस्त्याला पूर आला.
सन २०१७-१८ मध्ये संशोधन व विकास कार्यक्रमांतर्गत नांदगाव ते जगधने वाडा या २.४ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले. त्यावर १ कोटी ४५ लक्ष ६५ हजार रुपये खर्च झाला. मनमाड रस्त्याला संलग्न होणार असल्याने शहराच्या देवी मंदिर व नजीकच्या परिसरातील वाहतूक या मार्गाकडे वळून कोंडी काही प्रमाणात कमी होईल या उद्देशाने रस्ता तयार करण्यात आला.
आराखड्यात रस्त्यावरून पाणी वाहणार हे गृहीतक असावे म्हणून तो काँक्रीटचा करण्यात आला; पण त्यामुळे पाण्याला काही फरक पडला नाही. उलट पाणी वाहू लागल्यापासून रस्ता थोड्या दिवसांतच शेवाळ व तत्सम वनस्पती तयार झाल्याने निसरडा झाला. पायी चालणे तर दुरापास्त झाले; परंतु दुचाकीवालेही घसरले.
दोन वर्षांपासून दीड कोटीच्या रस्त्याला पूर येतो हे समीकरण रुळले. गेल्या वर्षी रस्त्यावर पाणी येते म्हणून पाण्याला खासगी बांधही घालण्यात आला होता; परंतु कदाचित निसर्गाला ते मंजूर झाले नाही. अल्पावधीतच तो बांध तुटला आणि पाणी मुक्त झाले. आता नदीचा पूर बघायला जाण्याआधी या रस्त्यावर आलेला पूर बघायला गर्दी होऊ लागली तर ती नवलाई ठरू नये. सध्या सायंकाळी अस्ताला जाणारा सूर्य रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यात डुबकी घेत असल्याचे रम्य दृश्य या रस्त्यावर फिरायला जाणाऱ्या नांदगावकरांना दिसते आहे. (०३ नांदगाव रेन)
030921\03nsk_6_03092021_13.jpg
०३ नांदगाव रेन