पंचवटी परिसरात पाण्याचा अपव्यय
By Admin | Updated: February 24, 2016 00:04 IST2016-02-23T23:46:55+5:302016-02-24T00:04:39+5:30
पंचवटी परिसरात पाण्याचा अपव्यय

पंचवटी परिसरात पाण्याचा अपव्यय
पंचवटी : गंगापूर धरणातील जलसाठा कमी झाल्याने प्रशासनाने दर आठवड्याला शहरातील एका भागात संपूर्ण दिवसभर पाणीकपात जाहीर केली आहे. पंचवटीतदेखील दर गुरुवारी पाणीकपात केलेली असली तरी सध्या पंचवटी परिसरात सुरू असलेली नवीन बांधकामे, वाहन सर्व्हिस स्टेशन, तसेच सार्वजनिक स्टॅँडपोस्ट व महापालिकेच्या जलवाहिन्यांना लागलेली गळती यामुळे दैनंदिन हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.
प्रशासनाने एकीकडे पाणी जपून वापरण्याबाबत आवाहन केले असले, तरी नागरिकांनी मात्र मनपाच्या या आवाहनावर पाणी फिरवले असल्याचे बघायला मिळत आहे. पंचवटी परिसरात नव्याने अनेक ठिकाणी इमारतींचे बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी दैनंदिन पाणी मारण्याचे काम केले जातेच शिवाय दुचाकीच्या सर्व्हिस स्टेशनवर वाहने धुण्याच्या नावाखाली शेकडो लिटर पिण्याच्या पाण्याचाच अपव्यय होत आहे. पंचवटीत अनेक ठिकाणी महापालिकेचे स्टॅँडपोस्ट असून, या स्टॅँडपोस्टवर पिण्याचे पाणी भरण्याबरोबरच महिलावर्ग धुणी-भांडी करत असल्याचे पाण्याचा मोठा अपव्यय होत आहे. हिरावाडीतील भिकुसा पेपर मिलमागे असलेल्या जलवाहिनीला गेल्या अनेक महिन्यांपासून गळती लागल्याने दैनंदिन हजारो लिटर पिण्याच्या पाण्याची नासाडी होत आहे. जलवाहिनी नादुरुस्त असल्याने २४ तास पिण्याचे पाणी वाया जाते. सदरची बाब लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी अनेकदा मनपाच्या निदर्शनास आणून दिली; मात्र मनपा प्रशासन जलवाहिनी दुरुस्त करण्याच्या कामाकडे उघडपणे डोळेझाक करत असल्याने पाणी गळती थांबणार कशी, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. (वार्ताहर)