जिल्हा रुग्णालयात पाण्याचा अपव्यय
By Admin | Updated: November 10, 2014 01:09 IST2014-11-10T01:08:26+5:302014-11-10T01:09:04+5:30
जिल्हा रुग्णालयात पाण्याचा अपव्यय

जिल्हा रुग्णालयात पाण्याचा अपव्यय
नाशिक : शासनाकडून वारंवार पाणी वाचवण्याबाबत प्रबोधन केले जात असले, तरी शासकीय यंत्रणाच याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येते़ जिल्हा शासकीय रुग्णालयातील विविध वॉर्डांसाठी असणाऱ्या टाक्यांचे व्यवस्थापन करणारा कर्मचारीच जागेवर राहत नसल्याने या टाक्या ओव्हरफुल्ल होऊन त्यातून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र रविवारी रात्री दिसून आले़ नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रमुख इमारतीतील तळमजल्यावर कॅज्युलटी, सिव्हिल सर्जन कार्यालय, इमर्जन्सी, प्रायव्हेट रूम, किचन, औषध भांडार, आयसीयू, पहिला मजल्यावर फिमेल सर्जिकल, पीएनसी, लेबर, एनआयसीयू, आॅपरेशन थिएटर, दुसऱ्या मजल्यावर जळीत कक्ष, फिमेल मेडिकल, मनोरुग्ण वॉर्ड, मेल सर्जिकल, तिसऱ्या मजल्यावर मेल मेडिकल, ट्यूब वॉर्ड, लहान मुलांचे वॉर्ड, या शेजारील इमारतीत कार्यालय, आय वॉर्ड, आर्थो वॉर्ड, इन्फेक्शन वॉर्ड, टीव्ही वॉर्ड आहे़ या सर्व वॉर्डला एकेक टाकी बसविण्यात आली असून, सर्वांसाठी एकच कनेक्शन आहे़ जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या या विविध वॉर्डांमध्ये पाण्याची व्यवस्था करण्यासाठी गच्चीवर टाक्यांची व्यवस्था असून, त्यात पाणी भरण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे़ या टाक्यांमध्ये पाणी भरण्यासाठी असलेल्या विद्युत मोटारी सुरू करून कर्मचारी गायब होत असल्याने हजारो लिटर पाणी वाया जाते़ रविवारी रात्री नऊ वाजेपासून सुरू झालेले विद्युत पंप रात्री बारा वाजेपर्यंत सुरूच असल्याने अक्षरश: हजारो लिटर पाणी वाया गेले़ याकडे जिल्हा शल्यचिकित्सकांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जाते आहे़