पाणी, टीडीआरप्रश्नी महासभा गाजणार
By Admin | Updated: February 16, 2016 00:36 IST2016-02-16T00:35:56+5:302016-02-16T00:36:58+5:30
महापालिका : टीडीआर धोरणास विरोध

पाणी, टीडीआरप्रश्नी महासभा गाजणार
नाशिक : महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने सुरू केलेली छुपी पाणीकपात उघडकीस आणल्यानंतरही शहरात काही भागात पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत असून, त्याचे पडसाद मंगळवारी (दि.१६) होणाऱ्या महासभेत उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाला पुन्हा एकदा महासभेत पाणीप्रश्नी प्रशासनाला सामोरे जावे लागणार आहे, तर राज्य शासनाने जाहीर केलेल्या टीडीआर धोरणाविरोधीही ठराव करून शासनाला पाठविण्याची तयारी सत्ताधारी मनसेसह महाआघाडीतील मित्रपक्षांनी केली आहे.
मंगळवारी होणाऱ्या महासभेत प्रामुख्याने तारांगणवर सल्लागार समिती स्थापन करणे, गोदापात्रातील पाणवेली काढण्यासाठी मक्तेदार नेमणे, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ, मनपाच्या इंग्रजी शाळांचे सेमी इंग्रजी शाळांमध्ये रूपांतर आदि विषय चर्चेला येणार आहेत. या विषयांबरोबरच पाणीप्रश्न आणि टीडीआर धोरणही तापण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील कॉलेजरोड, गंगापूररोड तसेच नाशिकरोड, इंदिरानगर, राजीवनगर आदि भागात पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत.