मौजे सुकेणे ग्रामपंचायतीला स्वनिधीतून पाण्याच्या टँकर
By Admin | Updated: July 22, 2014 01:18 IST2014-07-22T00:16:11+5:302014-07-22T01:18:06+5:30
मौजे सुकेणे ग्रामपंचायतीला स्वनिधीतून पाण्याच्या टँकर

मौजे सुकेणे ग्रामपंचायतीला स्वनिधीतून पाण्याच्या टँकर
कसबे सुकेणे : महात्मा गांधी तंटामुक्त गावाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकाविणाऱ्या मौजे सुकेणे ग्रामपंचायतीने ग्रामविकासात आणखी एक पाउल पुढे टाकले असून, स्वनिधीतून गावाला फिरत्या पाणीपुरवठ्यासाठी पाण्याच्या टँकरची खरेदी केली आहे.
मौजे सुकेणे येथे बाणेश्वर मंदिराच्या प्रांगणात ग्रामपंचायतीच्या नव्या टँकरचे पूजन उपसरपंच विजय मोगल, सुरेश निकम, विलास पाटील, सतीश मोगल, खंडेराव हंडारे, साहेबराव रहाणे, माजी सरपंच किरण मोगल, बाळासाहेब भंडारे, रत्नाकर मोगल व ग्रामस्थांच्या हस्ते पार पडले. ग्रामपालिकेने स्वनिधीतून हा टँकर खरेदी केला असून, गावात होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी व टंचाई काळात या टँकरचा उपयोग ग्रामस्थांना होणार असल्याचे यावेळी उपसरपंच विजय मोगल यांनी सांगितले. याप्रसंगी ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. शासनाच्या विविध योजनांची ग्रामपंचायतीने प्रत्यक्ष अंमलबजावणी केली असून, अंतर्गत रस्ते, सौरऊर्जेवरील पथदीप, पेव्हरब्लॉक, काँक्रीटीकरण, वृक्षारोपण यामुळे गावाचा चेहरा मोहरा बदलत आहे.
जलसंधारण योजनेअंतर्गत बाणगंगा नदीवरील बंधाऱ्यांची साठवण क्षमता वाढली असून, जुनी बाणगंगा नदीतील गाळ काढल्याने खऱ्या अर्थाने जलसंधारण झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना लाभ होत आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने गावात विविध योजना व विकासकामे प्रगतिपथावर असल्याचे यावेळी उपसरपंच विजय मोगल, सतीश मोगल व विलास पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)