पावसाळ्याच्या तोंडावर दहा तालुक्यांत टँकरद्वारे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:12 IST2021-06-05T04:12:03+5:302021-06-05T04:12:03+5:30
नाशिक: मागील वर्षी मुबलक पाऊस होऊनही जिल्ह्यातील ७२ गावांना पाणीटंचाई जाणवत असल्याने पावसाळ्याच्या तोंडावर या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा ...

पावसाळ्याच्या तोंडावर दहा तालुक्यांत टँकरद्वारे पाणी
नाशिक: मागील वर्षी मुबलक पाऊस होऊनही जिल्ह्यातील ७२ गावांना पाणीटंचाई जाणवत असल्याने पावसाळ्याच्या तोंडावर या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. सद्यस्थितीत दहा तालुक्यांमध्ये ५६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करून ग्रामस्थांची तहान भागवली जात आहे. शुक्रवारी बागलाणमध्ये एक टँकर सुरू करण्यात आला.
मागील मोसमात जिल्ह्यावर वरुणराजाची कृपादृष्टी बरसल्याने जिल्ह्यातील धरणे भरली होती. त्यामुळे नदी, नाले, विहिरींच्या पाण्याची पातळी देखील वाढल्याने यंदा टचाईच्या झळा बसणार नाहीत, अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु मे महिन्यातील पंधरवड्यानंतर विहिरींनी तळ गाठल्याने जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली. तीव्र उन्हामुळे टंचाईत अधिक भर पडल्याने पाण्यासाठी वणवण सुरू झाली.
नदी, नाले आटले तर विहीरींनी तळ गाठल्याने अनेक गावांमधून टँकरची मागणी होऊ लागली. तालुका पातळीवरून टँकर्स सुरू करण्याचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्याने जिल्ह्यात ऐन पावसाळ्याच्या तोंडावर टँकर्स सुरू करण्याची वेळ आली. मागील महिन्यात सुरू करण्यात आलेल्या टँकरच्या संख्येत या महिन्यात चारने वाढली असून, एकूण टँकरची संख्या ५६ इतकी झाली आहे.
सध्या टँकर सुरू करण्यात आलेल्या तालुक्यांमध्ये येवला आणि सुरगाण्यामध्ये सर्वाधिक टँकर सुरू आहेत. येवल्यात २८ तर सुरगाण्यात १२ टँकर सुरू आहेत. येवल्यात २८ गावे आणि १९ वाड्या तर सुरगाण्यात १२ गावांमध्ये सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पेठ आणि चांदवड या तालुक्यांमध्ये प्रत्येकी ८ याप्रमाणे टँकर सुरू आहेत.
जिल्ह्यात सध्या बागलाण, चांदवड, देवळा, मालेगाव, नांदगाव, पेठ, सुरगाणा, त्र्यंबक, येवला या तालुक्यांमधील ७२ गावे, ५१ वाडे यांना एकूण ५६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. यामध्ये ७ शासकीय तर ४९ खासगी टँकरचा समावेश आहे.
--इन्फाे--
७० विहिरी अधिगतहित
जिल्ह्यातील दहा तालुक्यांमधील १२३ ठिकाणी सुरू असलेल्या टँकर्सबरोबरच काही ठिकाणी विहीरी देखील अधिगृहित करण्यात आलेल्या आहेत. ५३ विहिरी या गावांसाठी तर १७ विहिरी या टँकरला पाणीभरण्यासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत. या विहिरींच्या माध्यमातून जिल्ह्यातील टंचाई जाणवत असलेल्या गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.