कालबाह्य पाणीपुरवठा योजनांमुळे दहा दिवसांआड पाणीपुरवठा - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:13 IST2021-04-15T04:13:17+5:302021-04-15T04:13:17+5:30

दशा पाणीटंचाईची; दिशा नियोजनाची (वृत्तमालिका) अतुल शेवाळे लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव : तालुका गेल्या दोन वर्षांपासून टॅंकरमुक्त आहे. यंदाही ...

Water supply within ten days due to expired water supply schemes - A | कालबाह्य पाणीपुरवठा योजनांमुळे दहा दिवसांआड पाणीपुरवठा - A

कालबाह्य पाणीपुरवठा योजनांमुळे दहा दिवसांआड पाणीपुरवठा - A

दशा पाणीटंचाईची; दिशा नियोजनाची (वृत्तमालिका)

अतुल शेवाळे

लोकमत न्यूज नेटवर्क

मालेगाव : तालुका गेल्या दोन वर्षांपासून टॅंकरमुक्त आहे. यंदाही पाणीपुरवठ्याची समाधानकारक स्थिती असताना कालबाह्य पाणीपुरवठा योजना, तांत्रिक बिघाड, कोरड्या पडलेल्या स्थानिक पाणीपुरवठा योजना, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा नियोजनशून्य कारभार यामुळे तालुक्यातील बहुतांश गावांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. काही गावांना तब्बल दहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. या कृत्रिम पाणीटंचाईमुळे महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. सध्या तरी पंचायत समितीच्या टंचाई विभागाकडे टॅंकरचा प्रस्ताव नसल्याने पिण्याच्या पाण्याची स्थिती दिलासादायक असल्याचे चित्र आहे.

मालेगाव तालुक्यात दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस पडत आहे. परिणामी तालुक्यातील लघु प्रकल्पांसह शहर व तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा, चणकापूर, पूनद, हरणबारी धरणात बऱ्यापैकी जलसाठा आहे. या धरणांवरून मोसम व गिरणा नदीला पाणी सोडले जाते. गिरणा व मोसम काठावरील गावांना सध्यातरी पाण्याची टंचाई जाणवत नाही. मात्र, गिरणा धरणालगतच्या काही खेड्यांना धरण उशाला, कोरड घशाला अशी अवस्था झाली आहे. या गिरणा धरणावरून ५६ खेडी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. मात्र, ही योजना कालबाह्य झाल्याने ठिकठिकाणी गळती लागलेली असते. जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा योजना कोलमडून पडत असते. परिणामी या योजनेंतर्गत येणाऱ्या कौळाणे, नगाव, मेहुणे, वऱ्हाणे, सोनज, सावकारवाडी, एरंडगाव, झाडी, जळगाव निं., जेऊर, निमगाव, हिसवाळ, दहिवाळ आदींसह इतर गावांना तब्बल दहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. १२ गाव, २६ गाव, माळमाथा पाणीपुरवठा योजनेचीही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. तालुक्यातील नागरिकांना पाणी उपलब्ध असताना केवळ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे, तर शेवाळीनाला, ५६ खेडी योजना, २६ गावयोजना, माळमाथा पाणीपुरवठा योजना या कालबाह्य झाल्या आहेत. कालबाह्य योजनांवरच तालुक्यातील जनतेची तहान भागविली जात आहे. राजकीय इच्छाशक्तीअभावी नवीन पाणीपुरवठा योजना निर्माण केल्या जात नसल्याने नागरिक हतबल झाले आहेत.

इन्फो...

गेल्यावर्षी तालुक्यातील सावकारवाडी येथे केवळ १२ दिवस टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. परिणामी यंदाही तालुका टॅंकरमुक्त असण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत कळवाडी, दाभाडी, वडनेर खाकुर्डी, सावकारवाडी, तर मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत दुंधे, मोरदर, आघार खु., खायदे आदी ठिकाणी कामे सुरू आहेत.

----------------------

इन्फो... यंदाही तालुका टॅंकरमुक्तीच्या दिशेने

येथील पंचायत समितीच्या टंचाई शाखेने संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. यात १०७ गावे व १८ वाड्यांचा समावेश आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक उपाय योजनांची तयारी करण्यात आली आहे. तालुक्यात मार्च २०१८ ते जुलै २०१९ पर्यंत ६० टॅंकरच्या सहाय्याने १०४ गावांना पाणीपुरवठा सुरू केला होता. २ वर्षांपूर्वी दमदार पाऊस झाला. तरीही मेअखेर सावकारवाडी गावाला १२ दिवस टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. यंदा समाधानकारक पाऊस झाला. छोटे-मोठे तलाव, स्थानिक पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांचे स्रोत जिवंत आहेत. त्यामुळे यंदाही तालुका टॅंकरमुक्त राहील, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.

------------------------

इन्फो... हातपंप ८१६

बंद हातपंप १०

टंचाई कृती आराखड्यातील गावे १०८ आराखड्यातील वाड्या १८ राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत कामे

मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत कामे

कालबाह्य पाणी योजना

Web Title: Water supply within ten days due to expired water supply schemes - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.