अंबड, सिडको भागात टॅँकरने पाणीपुरवठा
By Admin | Updated: March 10, 2016 23:58 IST2016-03-10T23:54:28+5:302016-03-10T23:58:46+5:30
टंचाईत दिलासा : मनसेने पुरविले १५ हून अधिक टॅँकर

अंबड, सिडको भागात टॅँकरने पाणीपुरवठा
सिडको : गेल्या काही दिवसांपासून पाण्याच्या टंचाईमुळे अनेकदा सिडको तसेच अंबड येथील नागरिकांना पाणीपुरवठा होत नाही. नागरिकांना पिण्यापुरते तरी पाणी मिळावे यासाठी मनसे सिडको विभागाच्या वतीने आज झोपडपट्टी भागासह इतर ठिकाणी मिळून दिवसभरात १५ हून अधिक टॅँकर फेऱ्यांच्या माध्यमातून पाणी दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
भविष्यात होणाऱ्या पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी मनपाच्या वतीने संपूर्ण नाशिक शहरात एक दिवस पाणीकपात करण्यात आली आहे. परंतु या व्यतिरिक्त इतर दिवशीही नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मनसेच्या वतीने नाशिक शहरात गेल्या शनिवार (दि. ५) पासून टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
सिडको व अंबड भागात मनसेचे गटनेते अनिल मटाले व सिडको विभाग अध्यक्ष रामदास दातीर यांच्या माध्यमातून ज्या नागरिकांना पाण्याची आवश्यकता आहे, त्यांनी मोबाइलद्वारे संपर्क साधल्यास त्यांना टॅँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येईल.
गुरुवारी कामटवाडेगाव, इंद्रनगरी, पांडवनगरी, राणेनगर, पाथर्डी या भागांसह अंबड येथील झोपडपट्टी भागात दिवसभरात दोन टॅँकरच्या माध्यमातून १२ ते १५ फेऱ्यांच्या सहाय्याने पाणीपुरवठा करण्यात आला. या मोहिमेत भास्कर दातीर, सुधाकर टावरे, बापू कदम, शिवाजी दातीर, अशोक आरोटे, संजय वाघमारे आदि सहभागी झाले होते.