Water supply schemes also hit | पाणीपुरवठा योजनांनाही फटका

पाणीपुरवठा योजनांनाही फटका

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा तडाखा : शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव सादर

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पहिल्या टप्प्यात ४० तर अवकाळीच्या तडाख्याने ३ अशा एकूण ४३ ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना पावसाचा फटका बसला असून, त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाचा तडाखा व पुरामुळे पाणीपुरवठा योजना नादुरुस्त होण्याबरोबरच काही योजनांचे पाईपच वाहून गेले आहेत. त्यामुळे या योजनांच्या दुरुस्तीसाठी तब्बल एक कोटी १३ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता लागणार आहे.
प्राप्त झालेल्या तक्रारीवरून ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने, पाणीपुरवठा योजनांची पाहणी केली असता त्यात निफाड तालुक्यातील १८ गावांमधील योजनांचे नुकसान झाले तर देवळा तालुक्यातील एका योजनेला पावसाचा फटका बसला आहे.
सिन्नर तालुक्यातील गावांमधील ११ योजनांचे नुकसान झाले आहे. नाशिक तालुक्यातील १० गावांमधील योजनांना पावसाचा फटका बसला असून, या सगळ्याच योजनांच्या दुरुस्तीसाठी एक कोटी १३ लाख ६९ हजार रुपयांची गरज आहे. असे असतानाच दोन आठवड्यांपासून अवकाळी पावसाने जिल्ह्णाला पुन्हा झोडपून काढल्यामुळे त्याचा फटका चांदवड तालुक्यातील दहेगाव-मनमाड पाणीपुरवठा योजनेला बसला आहे.
योजनेचा उद्भव असलेल्या विहिरीच्या आजूबाजूचा काँक्रीटचा भराव वाहून गेला आहे. तसेच पंपिंग हाउसच्या बाजूचाही भराव वाहून गेला. तीन इंच व्यासाची शंभर मीटर लांबीची पाइपलाइन वाहून गेली. या योजनेचे एकूण सव्वा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्या हातपंपाद्वारे ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात आहे. सटाणा तालुक्यातील निताणे येथील योजनेच्या विहिरीचे कंपाउंड पावसाने वाहून गेले आहे.
मोसम नदीच्या काठावर ही विहीर असून त्याचेही दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मालेगाव ताालुक्यातील सौंदाणे पाणीपुरवठा योजनेच्या वितरण व्यवस्थेतील पाइपलाइनचे नुकसान झाले आहे. गलाटी नदीचे पाणी गावात शिरल्याने योजनेला फटका बसला असून, दुरुस्तीसाठी दीड कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यासंदर्भात नुकसानाची अहवाल शासनाकडे सादर केला असून, दुरुस्तीसाठी लागणाऱ्या निधीची मागणी ही करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे ग्रामीण पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकूर यांनी
दिली.नदीकाठच्या शेतमालाचे मोठे नुकसानजिल्ह्यात यंदा मान्सूनचे उशिराने आगमन झाले असले तरी, जुलै अखेरीस त्याने दमदार हजेरी कायम ठेवली. त्यामुळे आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी होऊन नद्या, नाल्यांना पूर आले. त्यातही गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे गोदावरी नदीला महापूर येऊन नदीकाठच्या गावांमधील शेतमालाचे मोठे नुकसान झाले. या पुराचा फटका शेतमालासह जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांनाही बसला.

Web Title: Water supply schemes also hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.