आदिवासी भागात जलपुरवठा योजना
By Admin | Updated: December 20, 2015 00:29 IST2015-12-20T00:20:29+5:302015-12-20T00:29:51+5:30
शुभारंभ : सोशल नेटवर्किंग फोरमचा उपक्रम

आदिवासी भागात जलपुरवठा योजना
नाशिक : फेसबुकवरील तरुणांनी स्थापन केलेल्या सोशल नेटवर्किंग फोरमच्या वर्धापनदिनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण या दुष्काळी गावात पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ करण्यात आला. योजनेचा शुभारंभ वर्षानुवर्षांपासून डोक्यावर हंडा घेऊन पाणी वाहणाऱ्या महिलांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देवकाबाई बोरसे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
अडीच हजार लोकवस्तीच्या तोरंगण गावात उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. त्याची दखल सोशल नेटवर्किंग फोरमने घेऊन तज्ज्ञांच्या मदतीने त्यावर काम सुरू केले होते. त्यानुसार जलपुरवठा योजना राबविली जाणार असून, दोन किलोमीटरवरील नदीतील पाणी पाइपलाइनद्वारे गावात आणून अत्याधुनिक शुद्धीकरण यंत्रणेच्या सहाय्याने ते पिण्यायोग्य बनविले जाणार आहे. या योजनेद्वारे गावात बारमाही पाणी उपलब्ध होणार आहे. या कार्यात गावातील तरुण श्रमदान करणार आहेत, तर ग्रामपंचायतीनेही काही आर्थिक भार उचलला आहे. अन्य निधी फेसबुकवरील तरुण नेटिझन्सनी आपल्या पॉकेट मनीतून तसेच डॉक्टर्स, इंजिनिअर्स, शिक्षक अशा लोकांनी उभारला आहे. दरम्यान, योजनेचा शुभारंभ गावातील कोरड्या पडलेल्या विहिरीचे पूजन करून झाला. शुभारंभप्रसंगी सोशल फोरमचे सदस्य व महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे, सौ. जया सोनवणे, प्रमोद गायकवाड, डॉ. उत्तम फरताळे, डॉ. पंकज भदाणे, डॉ. प्रशांत देवरे, प्रशांत बच्छाव, महेश मुठा, डॉ. मंगेश चव्हाण, रामदास बोरसे, रामनाथ बोरसे, अंबादास बोरसे, देवराम पेंढार, भगवान बोरसे आदि उपस्थित होते.