इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे गावासाठी पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी दारणा नदीकाठापासून ते गावापर्यंत मुख्य पाणीपुरवठा करणारी जवळपास ५० फूट पाईपलाईन आहे. गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी दारणा नदी या ठिकाणी असलेल्या विहिरीवर पंप बसविलेला असून या विहिरीतून वर येणारा ५० फुटी सेक्शन पाईप अज्ञात चोरट्याने चोरी केला असून या चोरीमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे गावातील महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू झाली असून अज्ञात चोराचा ग्रामस्थांच्या वतीने शोध घेण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी दारणा नदीकाठी अंधार असल्यामुळे यावेळी तिकडे कोणीही फिरकत नसल्याचा फायदा घेत चोरट्याने चोरी केली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याआधी काही वर्षांपूर्वी दारणा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या विजेचे पंप, केबल, पाईप, स्टार्टर आदीं वस्तूंची चोरी झाली आहे.
इन्फो
चोरांचा बंदोबस्ताची मागणी
मागील वर्षी नांदूरवैद्य-वंजारवाडी रस्त्यावर ग्रामपंचायतीच्यावतीने तीन लाख रुपये किमतीचे पथदीपांचे खांब रोवण्यात आले होते. त्यावर पथदीपांची सोयदेखील करण्यात आली होती; परंतु पथदिपे नादुरुस्त झाल्यामुळे त्या ठिकाणी फक्त खांबच शिल्लक राहिले होते; परंतु अज्ञात व्यक्तींने या रस्त्यावरील उभ्या स्थितीत असलेले सात ते आठ खांब चोरी केल्याचे समोर आले आहे. या चोरांचा शोध घेण्यात येऊन लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.