दुसऱ्या दिवशीही पाणीपुरवठा ठप्प
By Admin | Updated: December 8, 2015 23:20 IST2015-12-08T23:19:31+5:302015-12-08T23:20:36+5:30
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचारी-अधिकाऱ्यांचे बेमुदत आंदोलन

दुसऱ्या दिवशीही पाणीपुरवठा ठप्प
नाशिक : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी सोमवारपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीच्या वतीने जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या आवारात पुकारण्यात आलेले बेमुदत आंदोलन मंगळवारी (दि. ८) दुसऱ्या दिवशीही कायम होते.
दरम्यान, या बेमुदत संपामुळे मालेगाव तालुक्यातील ५०, चांदवड तालुक्यातील ५०, सिन्नर तालुक्यातील पाच, ओझर साकोरे तीन गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अशा १०८ गावांचा, तसेच इगतपुरी शहर पाणीपुरवठा योजना व ओझर येथील संरक्षण केंद्र पाणीपुरवठा योजना या दोन शहरी अशा एकूण ११० योजनांचा पाणीपुरवठा या बेमुदत संपामुळे रविवारी मध्यरात्रीपासून खंडित झाल्याने शंभरहून अधिक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
या शुल्कातून मजीप्राच्या कर्मचाऱ्यांना वेतन व भत्त्यापोटीचा खर्च भागविला जातो. कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्याच्या खर्चासाठी शासनाकडून कोणतेही अनुदान दिले जात नाही. २२ फेब्रुवारी २०११ च्या शासन निर्णयानुसार ई अॅन्ड पी शुल्क १७.५ टक्के ऐवजी ५ ते ९ टक्केपर्यंत कमी करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते व निवृत्तीवेतनाचा खर्च कसा भागवावा हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे शासनात विलीनीकरण करून घ्यावे, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघर्ष समितीने वेगवेगळ्या टप्प्यात आंदोलन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कालपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात बेमुदत आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे.
या आंदोलनात संघटनेचे अजय चौधरी, एस. टी. निकम, आनंद जवंजाळ, कृष्णा झोपे यांच्यासह विभागातील सर्वच कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)