मनसेकडून तीन कोटी लिटर्स पाणीवाटप

By Admin | Updated: June 30, 2016 00:20 IST2016-06-29T23:30:04+5:302016-06-30T00:20:34+5:30

४१५२ फेऱ्या : तीन महिन्यांत दहा टॅँकरद्वारे सेवा

Water supply from MNS to three crore liters | मनसेकडून तीन कोटी लिटर्स पाणीवाटप

मनसेकडून तीन कोटी लिटर्स पाणीवाटप

 नाशिक : शहरात एकवेळ पाणीपुरवठ्यासह आठवड्यातून एक दिवस पाणीकपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने टॅँकरद्वारे मोफत पाणी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविला. तीन महिन्यांत मनसेने दहा टॅँकरच्या माध्यमातून ४१५२ फेऱ्यांद्वारे २ कोटी ८५ लाख लिटर्स पाण्याचा मोफत पुरवठा केल्याची माहिती पक्ष कार्यालयाकडून देण्यात आली.
गंगापूर धरणातील हक्काचे पाणी जायकवाडीसाठी पळविले गेल्याने भाजपाविरोधी कमालीचा रोष निर्माण झाला होता. महापालिकेने धरणातील उपलब्ध पाणीसाठा ३१ जुलैपर्यंत पुरविण्यासाठी एकवेळ पाणीपुरवठ्यासह आठवड्यातील एक दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचवेळी सत्ताधारी मनसेने शहरातील नागरिकांना मागेल तेथे टॅँकरने मोफत पाणीपुरवठा करण्याचा उपक्रम सुरू केला. सदर उपक्रमाची सुरुवात ५ मार्च रोजी संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी मनसेने दहा टॅँकर्स उपलब्ध करून दिले. मनपाच्या जलकुंभांवरून टॅँकरमध्ये पाणी घेण्यास आयुक्तांनी मान्यता दिली होती. त्यावेळी मनपाच्या पाण्यावर मनसेचा झेंडा लावण्यास सेनेसह अन्य विरोधी पक्षांनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे महासभेने नोंदणीकृत संस्थांना ५०० रुपयांच्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे पाणी पुरविण्यास मान्यता दिली होती. मनसेने टॅँकरने मोफत पाणीवाटप उपक्रम ३१ मे २०१६ पर्यंत राबविला. या उपक्रमांतर्गत तीन महिन्यांत २ कोटी ८५ लाख लिटर्स पाण्याचा मोफत पाणीपुरवठा करण्यात आल्याची माहिती मनसेचे प्रवक्ते संदीप लेनकर आणि पदाधिकारी सचिन भोसले यांनी दिली.
याशिवाय, मनसेचे नगरसेवक सलीम शेख, राहुल ढिकले, बालाजी माळोदे, गणेश चव्हाण, अनिल मटाले, सुरेखा भोसले यांनीही आपल्या प्रभागात टॅँकरने पाणी उपलब्ध करून दिले आहे. सदर नगरसेवकांकडून उपक्रम सुरूच आहे. नाशिककरांनी पाणीकपातीला दिलेली साथ यामुळेच धरणातील पाणी ३१ जुलैपर्यंत पुरविणे मनपाला शक्य झाले असल्याचा दावा मनसेने केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Water supply from MNS to three crore liters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.