सिडको विभागातील पाणीपुरवठा विस्कळीत
By Admin | Updated: November 1, 2014 23:59 IST2014-11-01T23:59:16+5:302014-11-01T23:59:58+5:30
महिलांची भटकंती : विभागप्रमुख अनभिज्ञ

सिडको विभागातील पाणीपुरवठा विस्कळीत
सिडको : गेल्या काही दिवसांपासून सिडको विभागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणीपुरवठा ही महत्त्वाची व अत्यावश्यक बाब असतानाही संबंधित विभागाचे प्रमुख मात्र कार्यालयात न बसता साईट व्हिजिट करण्यातच धन्यता मानत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने व अवेळी होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे महिलावर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनलेला असतानाही संबंधित विभागाचे उपअभियंता संजय बच्छाव मात्र याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप केला जात आहे. पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना बच्छाव यांची भेटच मिळत नसून साहेब व्हिजिटला गेले आहेत असेच कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येते.
मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार नागरिकांच्या तक्रारींचे निरसन तसेच विविध कामकाजासाठी दुपारी तीन वाजेपासून अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसणे बंधनकारक असतानाही बच्छाव मात्र कार्यालयात हजर राहत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. (वार्ताहर)