३६ ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:10 IST2021-06-17T04:10:58+5:302021-06-17T04:10:58+5:30
इगतपुरी तालुक्यात महावितरण कंपनीने १२८ ठिकाणी पाणीपुरवठा वीजजोडणी दिलेली आहे. त्यापैकी ३६ ग्रामपंचायतींकडे सात कोटी ५० लाखांच्यावर ...

३६ ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा खंडित
इगतपुरी तालुक्यात महावितरण कंपनीने १२८ ठिकाणी पाणीपुरवठा वीजजोडणी दिलेली आहे. त्यापैकी ३६ ग्रामपंचायतींकडे सात कोटी ५० लाखांच्यावर थकबाकी आहे. गेल्या २ ते ३ वर्षांपासून महावितरण कंपनीची बिले मोठ्या प्रमाणात थकीत आहेत. वेळोवेळी मागणी करूनसुद्धा तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींनी थकीत बिले भरले नसल्याने वीजजोडणी खंडित होण्याची नामुष्की ओढवली आहे.
इगतपुरी तालुक्यात ९६ ग्रामपंचायती असून, पाणीपुरवठा व पथदीपांकरिता वेगवेगळी जोडणी वीज वितरण कंपनीने दिली आहे. येत्या काळात थकीत बिले न भरल्यास गाव अंधारात राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऐन पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गावे अंधारात राहू नये म्हणून ग्रामपंचायतकडे महावितरण कंपनी बिले भरण्यासाठी मागणी करत असून, ग्रामपंचायतीत नियोजनाचा अभाव असल्याने नागरिकांना विविध संकटांचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
इन्फो
..या ग्रामपंचायतींवर केली कारवाई
पाणीपुरवठ्याचा विद्युत पुरवठा खंडित केलेल्या ग्रामपंचायतींमध्ये वाकी, कुर्णोली, बिटुर्ली, टाकेद, धामणी, खेड, उंबरकोण, खडकेद, कावनई, साकूर, धारगाव, सातुर्ली, जानोरी, नांदगाव बु., बारशिंगवे, उंबरकोण, सोनोशी, शेवरेवाडी, अधरवड, उभाडे, अडसरे, धामणगाव, भावली, आहुर्ली, आवळी, वासाळी, इंदोरे, देवळे, मुरंबी, अस्वली, आवळखेड, घोटी खुर्द, निनावी यांचा समावेश आहे.
कोट....
तालुक्यातील ग्रामपंचायतींनी गत २ ते ३ वर्षांपासून थकबाकी भरली नसल्याने ३६ ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठ्यासाठीचा असलेला विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असून, त्वरित थकीत रक्कम न भरल्यास पथदीपांचा वीजपुरवठासुद्धा नाइलाजास्तव खंडित करावा लागेल. संबंधितांनी महावितरण कंपनीला सहकार्य करावे व थकीत रक्कम त्वरित भरावी.
- मंगेशकुमार प्रजापती, उपकार्यकारी अभियंता, इगतपुरी